- हल्ल्याचे मुख्य सूत्रधार आमदार महेश लांडगे?
- दत्ता साने यांचा मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सात महिन्यापूर्वी त्यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा तपास CBI कडे वर्ग करावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे केली आहे. याबाबत माहिती देण्यासाठी त्यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
या पत्रकार परिषदेत बोलताना साने म्हणाले की, गुन्हा रजि नं ०४२२/२०१९ या गुन्हयातील तपास योग्यरीत्या झालेला नाही. हा तपास पुन्हा एकदा Central Bureau of Investigation कडे देऊन माझ्या ऑफीसवर झालेल्या हल्याची खरी सत्यता बाहेर येण्यासाठी हा तपास CBI कडे पुन्हा तपास देण्याकामी गृहमंत्री अनिल देशमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडुन तसे आदेश देण्याची विनंती करावी. असे झाले नाहीतर मी (दि. ०२-०३-२०२०) रोजी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे.
निवेदनाच्या प्रती दत्ता साने यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र राज्य गृहमंत्री अनिल देशमुख आणि जिल्हाधिकारी पुणे यांना दिल्या आहेत.
दरम्यान पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात साने यांनी म्हटले आहे की, शुक्रवार (दिनांक ०७/०६ /२०१९) रोजी सायंकाळी ४.३० वाजता सहा – सात अज्ञात हल्लेखोरांनी माझ्या साने चौक, चिखली येथील संपर्क कार्यालयावर हल्ला करून कार्यालयातील संगणक, माझ्या फोटोवर कोयत्याने वार केले व इतर साहित्याची मोडतोड करून मोठया प्रमाणावर नुकसान केले आहे. माझ्या फोटोवर ज्याअर्थी त्यांनी वार केले त्याअर्थी त्यांना माझ्यावर जिवघेणा हल्ला करून मला संपवण्याचा मुख्य उद्देष होता हे सिध्द होत आहे.
त्या अनुषंगाने मी याबाबत रीतसर तक्रार क्र. ०४२२/२०१९ साने पोलीस चौकी येथे गुन्हा दाखल करून चिखली पोलीस ठाणेकडे देण्यात आला. तेथील पोलीस तपासीक यांना तपास व्यवस्थीत जमत नसल्याने तो तपास क्रार्इम युनिट ०१ यांचेकडे देण्यात आला यावरून असे दिसुन येते की, तपासामध्ये एक तर कोणाला तपास करता येत नाही किंवा कोणाच्यातरी सांगण्यावरून तपासामध्ये वारंवार फेरबदल करत असल्याचे दिसुन येते व यामुळे पोलीस तपासकावर देखील संशय बळावतो. हया तपासामध्ये खुप मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे. यामुळे त्यांच्या कामामध्ये हलगर्जीपणा केल्याचे दिसुन येत आहे. तसेच या गुन्हयातील एकुण ०७ आरोपीपैकी ०७ आरोपी सापडलेले असुन त्यांच्या कडून कोणत्याही प्रकारची कबुली मिळाली नाही. गुन्हा घडतेवेळी किंवा त्यांच्या पाठीमागील एकुण ०६ महीन्यापुर्वी त्या आरोपीतांनी कोणत्या व्यक्तीशी संपर्क साधला किंवा मध्यस्ती इतर कोणत्या एजंटव्दारे संपर्क साधला याबाबत सायबर सेलकडुन आपण स्वत: लक्ष घालुन हल्यातील मुख्य आरोपी व सुत्रधार कोण आहेत याबाबत सत्य परीस्थिती उघडकीस आणावी.
या गुन्हयातील आरोपीबाबत मी स्वत: त्यातील सुटलेल्या आरोपीबरोबर बोललो असता खाजगीरीत्या चौकशी केली असता अशी माहीती समोर येत आहे की, या हल्यामागे पांडुरंग बाळासाहेब साने यांनी माझ्या हत्येची सुपारी रावण टोळीतील दिनेश रेणवा याला दिलेली असुन, दिनेश रेणवा हा पांडुरंग साने यांचा अत्यंत जवळचा मित्र आहे त्याचे पुरावे मा. पोलीस आयुक्त यांच्याकडे मी स्वत: दिलेले आहेत. या हल्यामागे मुळ सुत्रधार संबंधित भोसरी विधानसभा आमदारसुध्दा सामील आहेत व त्यांचे बगलबच्चे यांच्याशी संबंधित असलेल्या गुन्हेगारांमार्फत हा कट रचण्यात आला आहे, अशी विश्वसनीय बातमी माझ्या सुत्रांकडुन मला मिळालेली आहे. तसेच माझ्या परिसरामध्ये आजुबाजुला याची गुप्त चर्चा देखील आहे. या दोन लोकांवर माझा शंभर टक्के संशय आहे कारण माझे राजकीय शत्रु हेच आहेत.
मी विरोधी पक्षनेता झाल्यापासुन मा. महेश लांडगेंची अनेक प्रकरणे मिडीयाच्या माध्यमातुन उजेडात आणली होती आणि मी विधानासभा २०१९ साठी त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणुन तीव्र इच्छुक होतो. याचा राग मनात धरून मला संपुर्ण संपवण्याचा प्रयत्न केला. नशीब बलवत्तर हल्ला होण्याच्या १० मिनीटे अगोदरच माझे कार्यालयातुन मनपाच्या कार्यालयात गेलो होतो म्हणुन माझ्या जीवीतास काही धोका झाला नाही.
हल्लेखोर हे रावण टोळीमधील असुन ही टोळी रोख रक्कम घेवुन जीवे मारण्याची सुपारी रोख घेतात. याचा अर्थ असा होतो की, या गुन्हयात कोणीतरी एजंट असल्याचे दिसुन येते. सत्तेतील आमदार यामागे असल्यामुळे या हल्याचा तपास व्यवस्थित होत नाही. कारण त्यावेळेस मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे गृहखाते होते त्याचा पुरेपुर गैरफायदा घेवुन किंवा तपासाची दिशाभुल करून तपासाची दिशा मुद्दाम दुसरीकडेच नेण्याचा प्रयत्न केला गेला आहे, असा माझा गंभीर आरोप आहे आणि ते सत्य आहे. कारण त्यातले ०६ आरोपी सुटलेले आहेत. त्यातील काहीजणांच्या संपर्कातील गुन्हेगार हे त्यांच्याबरोबर जेलमध्ये होते. ते सुटुन नुकतेच आलेले आहेत. त्यांनी ही सर्व त्यांच्याबरोबरची बोलचाली मला सांगीतली.
माझ्या ऑफीसवर हल्ला करणा-या गुन्हेगारांचे म्हणणे असे आहे की हा तपास CBI कडे देवुन आम्हाला बोलवुन आमचे सत्य जबाब नोंदवुन घ्यावेत असे त्यांनी मला काल रात्री सांगीतले. तरी माझ्या जीवीतास धोका असुन माझ्या जीवास काही बरे वार्इट झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी. जर मी सांगुनसुध्दा मुख्य सुत्रधारावर किंवा ज्यांनी सुपारी दिली त्यांचेवर कार्यवाही होत नसेल तर मी उदया कायदा हातात घेवुन जर काही बरे वार्इट झालेस किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मा. मुख्यमंत्री गृहखाते व मा. पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांची राहील. होणा-या परिणामास आपण जबाबदार व्हाल याची आपण नोंद घ्यावी.
मी दि. ०२ /०३ /२०२० रोजी पोलीस कमिशनर ऑफीससमोर आमरण उपोषणाला बसणार आहे. जोपर्यंत मुख्य सुत्रधारांना अटक होत नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही. असे मी आपल्यामार्फत त्यांना कळवावे. तरी आपणांस विनंती आहे की, सदर आरोपीतांचे नार्कोटेस्ट करण्यासंबंधी कोर्टाकडुन परवानगी घ्यावी. तसेच हा तपास क्रार्इम युनिट ०१ यांचेकडुन वगळुन Central Bureau of Investigation यांच्याकडे देण्यात यावा, असे या निवेदनात साने यांनी म्हटले आहे.















