- आयआयबीएमच्या “बॉलीवूड फूड फेस्टिवल २०२०” उपक्रमास पुण्यासह महाराष्ट्रातूनही प्रचंड प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२०) :- चिखलीतील आयआयबीएम ग्रुप ऑफ इंस्टिट्यूटच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या वतीने आयोजित “बॉलीवूड फूड फेस्टिवल २०२०” हा उपक्रम नुकताच संस्थेच्या आवारात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सर्वात मोठ्या या फूड फेस्टिव्हलमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी पुणे जिल्ह्यातील तसेच पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी गर्दीचा उच्चांक केला. उत्कृष्ठ संगीत, १५० पेक्षा जास्त रेसिपी, संस्थेचे योग्य व्यवस्थापन व सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी, अशा आगळया वेगळया थाटात संपन्न झालेल्या या फेस्टिव्हलने परिसरातील नागरिक व खवय्ये भारावून गेले होते. हॉटेल व्यवस्थापनाचा एक अविभाज्य भाग म्हणून संस्थेतील विद्यार्थ्यांना व्यवस्थापन, विक्री कौशल्य यांच्या सखोल अभ्यासासाठी या फेस्टिव्हलच्या माध्यमातून प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पिंपरी चिंचवड शहराचे उपमहापौर तुषार हिंगे व आयआयबीएम कॉलेजचे संस्थापक डॉ. धनंजय वर्णेकर यांनी सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलन करून, कार्यक्रमास सुरुवात केली. यावेळी आयआयबीएम कॉलेजचे संस्थापक डॉ. धनंजय वर्णेकर, सौ. शितल वर्णेकर, संचालक राम रैना, जनरल मॅनेजर शिरीन वस्तानी, विभागप्रमुख डॉ. गायकवाड, विभागप्रमुख अमोल भागवत, कुदळवाड़ी पोलिस स्टेशनचे PSI देशमुख, PSI धनगर, हिंदुस्तान यूनिलिव्हरचे मुख्य शेफ राजकुमार झा व ग्रुप, आपली सखी आपला आवाज मधून संगीता तरडे व अतुल परदेशी, ताज विवांता हॉटेलचेएच आर व्यवस्थापक प्रकाश चंद, कोर्टयार्ड मॅरेड हॉटेलचे एच आर प्रतिनिधी रोशन सर, अम्बि वॅलीचे शेफ विशाल बरोले, फरियाज़ मधून एच आर प्रतिनिधी अक्षय सर व मोनिका राव, मा. नगरसेवक एस. के. भालेराव, सुरेश म्हेत्रे, पांडाभाऊ भालेकर यांच्यासह महाराष्ट्रातील १०० पेक्षा जास्त शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या फूड फेस्टिव्हलचे मुख्य आकर्षण हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी ब्रेड पासून तयार केलेला मोठ्या आकाराचा भारताचा नकाशा. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे स्वरूप बॉलीवूड पद्धतीचे असल्यामुळे विद्यार्थ्यानी विविध जुन्या काळातील अभिनेत्री व अभिनेत्यांची वेशभुषा धारण करून, कार्यक्रमामध्ये रंगत आणली. तसेच विद्यार्थ्यानी ३०० हुन अधिक पदार्थांचे प्रदर्शन व विक्री केली. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्यासाठी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी पंचतारांकित हॉटेलला शोभेल अशा थाटात भोजनाची व्यवस्था केली. बॉलीवूडच्या १९६० ते १९९० च्या दशकातील लोकप्रसिद्ध क्लासिक गीतांच्या तालावर तरुणाई थिरकत होती. दरम्यान महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधून आलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे पंचतारांकित हॉटेलमधून आलेले व्यवस्थापक व शेफ यांचादेखील यावेळी सत्कार करण्यात आला. उपस्थित कॉलेजचे माजी विद्यार्थी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपमहापौर तुषार हिंगे म्हणाले, कामानिमित्त घरापासून लांब दुसऱ्या शहरात राहावं लागणार असेल, तर आरामशीर आणि सुविधा असलेल्या हॉटेलची निवड केली जाते. हॉटेलमध्ये राहणं आरामदायी करणारं क्षेत्र म्हणजे हॉस्पिटलिटी इण्डस्ट्री. जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेत अनेक चढउतार होत असतानाही या क्षेत्राची सतत भरभराटीकडे वाटचाल होत आहे. हॉटेल मॅनेजमेण्ट हे या क्षेत्राचाच एक भाग आहे. त्यामुळे विद्यार्थ्याना या क्षेत्रात नोकरीच्या व व व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्राच्या माध्यमातून चिखलीतील आयआयबीएम ग्रुप ऑफ इंस्टिट्यूटची हॉटेल मॅनेजमेंट ही संस्था विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीचे शिक्षण देत, भावी शेफ घडवीण्याचे कौतुकास्पद काम करीत आहे.
संस्थेचे संस्थापक डॉ. धनंजय वर्णेकर म्हणाले की, मागील काही दशकांपासून हॉटेल व्यवसायाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. स्पर्धा वाढली आणि त्यातून या विषयाचा शास्त्रीय अभ्यास वाढला. यातून हॉटेल मॅनेजमेंट नावाचं करिअर उदयास आलं. एक हॉटेल चालवण्यासाठी, सांभाळण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहेत, त्यासाठी पडेल ते काम करण्याची तयारी असावी लागते. आज भारतात व परदेशात एक यशस्वी करियर म्हणून हॉटेल व्यवस्थापनाकडे पाहिले जात आहे. “बॉलीवूड फूड फेस्टिवल २०२०” या संकल्पनेला साजेसा असा हा फेस्टिव्हल पिंपरी चिंचवड-पुणे जिल्ह्यासाठी एक पर्वणी ठरला. प्रचंड गर्दी, सुसज्ज व्यवस्थापन, भारतातील अनेक खाद्य पदार्थांची रेलचेल यांची या कार्यक्रमात भरमार होती. आयआयबीएम कॉलेजच्या माध्यमातून देशात व परदेशात हजारो विद्यार्थी या क्षेत्रात आपली विशेष अशी ओळख निर्माण करीत आहेत. त्यांच्या या कामगिरीचा संस्थेला अभिमान आहे.
संचालक राम रैना यांनी देशातील शहरांचा औद्येगिक विकास झपाट्याने होत असल्याने तेथे त्रितारांकीत व पंचतारांकीत टोलेजंग हॉटेल्स उभी रहात आहेत. हॉटेल व्यवसायाला इंडस्ट्रीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हॉटेल मॅनेजमेंट हा प्रमुख व्यवसाय म्हणून नावारूपाला आला आहे. प्रत्येक व्यक्तीत एक वेगळी कला असते. त्या कलेचा योग्य उपयोग करीत त्याचे प्रशिक्षण घेतले की, त्यात करिअर करता येते. जर तुमच्यात ‘पाककला’ आहे आणि त्यातच करिअर बनविण्याचे तुम्ही स्वप्न बघत आहात तर हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम तुमच्यसाठी उत्तम पर्याय सिद्ध होऊ शकतो. संस्थेतील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन एक संघटीत विचारशक्तीच्या आधारावर १०० किलोच्या ब्रेडपासून बनविलेला भारताचा नकाशा या फूड फेस्टिव्हलमध्ये सर्वांचे आकर्षण ठरला. या माध्यमातून हॉटेल इंडस्ट्रीमधील थ्री स्टार किंवा फाइव्ह स्टार हॉटेल्समधील सादरीकरण, ड्रेसअप, संवाद कौशल्य कसे असावे आदी बाबी विद्यार्थ्यांना आत्मसात करता आल्या. ‘हॉटेल इंडस्ट्रीतील करिअर, संधी आणि आव्हाने’ याबाबतीतही फूड फेस्टिव्हलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निश्चितच होईल, असे प्रतिपादन केले.
विभागप्रमुख अमोल भागवत म्हणाले की, हॉटेल हे अनुभवसिद्ध करिअर आहेत. यात तुमचं वेगळंपण सिद्ध करावं लागतं. यात तुम्ही काय वेगळा आणि चांगला अनुभव देता, यावर तुमचं यश अवलंबून आहे. ब-याच लोकांना चांगलं जेवण करून लोकांना खायला घालायला आवडतं. तसं तुम्हाला लोकांना उत्तम चवीचं जेवण द्यायला आवडत असेल तर हॉटेल मॅनेजमेंटचं क्षेत्र तुम्हाला साद घालेल, मात्र त्याचा शास्त्रीय अभ्यास करणं गरजेचं आहे. त्या कलेचा योग्य उपयोग करीत त्याचे प्रशिक्षण घेतले की, त्यात करिअर करता येते. जर तुमच्यात ‘पाककला’ आहे आणि त्यातच करिअर बनविण्याचे तुम्ही स्वप्न बघत आहात तर हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम तुमच्यसाठी उत्तम पर्याय सिद्ध होऊ शकतो. या अभ्यासक्रमात तुम्ही पाककलेत भर घालून त्यात करिअर करू शकता. संस्थेतील हॉटेल मॅनेजमेंटमध्ये शिकणा-या डिप्लोमा व डिग्री अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यानी हा फूड फेस्टिव्हल यशस्वी करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे नियोजन मुख्य शेफ सचिन देसाई, प्राध्यापक गिरीश काटे, पीटर गोम, आदित्य वर्तक यांनी तर, विविध जिल्ह्यामधुन आलेल्या शैक्षणिक मान्यवरांचे व्यवस्थापन व समन्वयक प्रतिक्षा डफळ, संतोष घाडगे व अतुल पुंडे यांनी केले. तसेच विभागप्रमुख अमोल भागवत यांनी आभार प्रदर्शन केले.