- विधीमंडळ अधिवेशनात आ. लांडगेंकडून प्रश्न उपस्थित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. मार्च २०२०) :- पिंपरी-चिंचवडमधील शास्तीकर माफीसाठी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारचे लक्ष वेधले. विधीमंडळ अधिवेशनात औचित्याचा प्रश्न उपस्थितीत करीत आमदार लांडगे यांनी शहरवासीयांची बाजू मांडली.
आमदार लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या सुमारे २८ लाखांच्या घरात आहे. अनधिकृत बांधकांचीही संख्या मोठी आहे. गत सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ हजार चौरस फूट क्षेत्रापर्यंतच्या अनियमित बांधकांवरील शास्तीकर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, १ हजार ते २ हजार चौरस फुटापर्यंत ५० टक्के शास्ती घेण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, शहरातील अनेक बांधकामे ही २००० चौरस फुटांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे शहरातील २०२० पर्यंतचा संपूर्ण शास्तीकर सरसकट माफ करावा. कारण, अनेक वर्षांपासून नागरिक याठिकाणी राहतात. त्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे, असेही लांडगे म्हणाले.















