न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मार्च २०२०) :- गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संस्कार ग्रुपच्या व्यवस्थापकास दिघी पोलिसांनी अटक केली. राजू बाजीराव बुचडे (वय ५५, रा. मारुंजी, ता. मावळ) असे त्याचे नाव आहे.
विशेष न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सत्र व उच्च न्यायालयात पअटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर, त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने बुचडे याला पुणे पोलिसांकडे शरण जाण्यास सांगितले. याप्रकणी प्रमिला सुनील दरेकर (वय ५०, रा. दरेकरवाडी, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.
ही घटना १ एप्रिल २०१० ते फेब्रुवारी २०१६ दरम्यान घडली. यापूर्वी वैकुंठ प्रल्हाद कुंभार, राणी वैकुंठ कुंभार, रामदास बबन शिवले, शिवाजी ढेरे यांना अटक करण्यात आली आहे.
संस्कार ग्रुपच्या नावाखाली महिला बचतगट, संस्कार फांऊडेशन, शैक्षणिक उपक्रम अशा अनेक नावांच्या वेगवेगळ्या कंपन्या व संस्कार अर्बन को – ऑप सोसायटी क्रेडिट सोसायटी लि. स्थापन करून फिर्यादी आणि इतर गुंतवणूकदारांना १२ ते १४ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून २२ कोटींची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. बुचडे हा संस्कार ग्रुपमध्ये एजंट व्यवस्थापक होता. त्याने ४०० पेक्षा जास्त गुंतवणूकदारांची १९ कोटी रुपये कंपनीत गुंतवणूक करून लाखो रुपये कमिशन घेतले आहे. चल व अचल मालमत्ता घेतली आहे, गुन्हयातील कागदपत्रे, मुख्य संगणक यांची कशा प्रकारे विल्हेवाट लावली आदी तपास करायचा असल्याने सरकारी वकिल जावेद खान यांनी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ती मान्य केली.


















