- पुढील वर्षापासून पवनाथडी जत्रेचे ठिकाण बदलणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मार्च २०२०) :- पिंपरी – चिंचवड पालिकेच्या वतीने भरविण्यात येणाऱ्या पवना थडी – जत्रेचे ठिकाण पुढील वर्षी सांगवीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे ( पीडब्ल्युडी ) मैदान, पिंपरीतील एच. ए. मैदान अथवा अन्य पुरेशी जागा उपलब्ध होत असेल तर, अशा ठिकाणी एक – एक वर्ष या उपक्रमाचे आयोजन करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महिला बाल कल्याण समितीपुढे प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे लेखी आश्वासन महापालिकेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिले आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने पवनाथडी जत्रा वारंवार सांगवीतील पीडब्ल्युडी मैदानावरच का भरविण्यात येते. त्या ऐवजी पिंपरीतील एच. ए. या मैदानावर पवनाथडी जत्रा भरवावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहर सचिव सीमा बेलापूरकर यांनी नागरवस्ती विभागाकडे लेखी पत्राद्वारे केली होती.
त्यानुसार नागरवस्ती विकास योजना विभागाचे सहायक आयुक्त उल्हास जगताप यांनी लेखी पत्राद्वारे उत्तर दिले आहे. पवनाथडी जत्रा २०२० चे आयोजन दि. ४ मार्च ते ८ मार्च या कालावधीत सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदान येथे करण्यात आले आहे. आता मनसेच्या मागणीप्रमाणे विचार करण्याकरीता कमी कालावधी आहे. त्यामुळे सध्याच्या ठिकाणामध्ये बदल करता येणार नाही. तथापी आपल्या मागणीनुसार पुढील वर्षापासून पालिका हद्दीत एच. ए. मैदान, पीडब्ल्यूडी मैदान या अथवा इतर ठिकाणी पुरेशी जागा उपक्रमासाठी उपलब्ध होत असेल तर अशा ठिकाणी एक – एक वर्ष या उपक्रमाचे आयोजन करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महिला व बाल कल्याण समितीपुढे प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे जगताप यांनी लेखी पत्रात म्हटले आहे.