न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मार्च २०२०) :- दुकान खाली करण्यासाठी मुदतवाढ देण्याकरिता दुकानदाराकडून दीड हजार रुपयांची लाच घेताना सांगवी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ( एसीबी ) अटक केली. ही कारवाई बुधवारी ( दि . ४ ) करण्यात आली आहे. संगीता विनोद गायकवाड ( वय ४८ ) असे अटक केलेल्या पोलीस हवालदार महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने ६० फुटी डी. पी. रोड, पिंपळे गुरव येथे भाडेतत्त्वावर दुकान घेतले होते. या दुकानाचा करारनामा संपल्यानंतर तक्रारदारांनी दुकानाचा ताबा सोडला नाही. याबाबत मूळ मालकाने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचा तपास महिला पोलीस हवालदार गायकवाड हिच्याकडे होता.
गायकवाड यांनी भाडेकरू दुकानदाराकडे दुकान खाली करण्यासाठी वाढीव मुदत देण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती तीन हजार रुपये देण्याचे ठरले. त्यातील दीड हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना पकडले आहे. शासकीय कामासाठी कोणी लोकसेवक लाचेची मागणी करीत असेल तर नागरिकांनी १०६४ या हेल्पलाइनवर किंवा ०२० – २६१२२१३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, पोलीस निरीक्षक गिरीश सोनवणे, अंकुश माने, श्रीकृष्ण कुंभार, जाधव यांच्या पथकाने केली आहे.















