न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मार्च २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहराला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहराचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणे आवश्यक होते. तसेच, पालिका भवनावर रोषणाई करून सजावट करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे होते. मात्र, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ते केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणार आहे, असे महापौर उषा ढोरे यांनी गुरुवारी ( दि. ५) सांगितले.
महापौर ढोरे म्हणाल्या की, शहराला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पालिका भवनात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली होती.
जयंती व पुण्यतिथीशिवाय पुष्पहार अर्पण करता येत नसल्याचे दिशाभूल करणारे उत्तर त्यांनी दिले. या प्रकरणी अधिक माहिती घेऊन पुतळ्यास पुष्पहार न घातल्याबद्दल आणि पालिका भवनात रोषणाई न केल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले.













