न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मार्च २०२०) :- कॉलेजमधील मित्र काही दिवस मेडिकल दुकानदार मित्राकडे मेडिकलसाठी औषध खरेदी – विक्री करीत होते. त्याने मेडिकलच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे घातक औषधांची खरेदी करून साठा केला. तसेच डॉक्टरांच्या परवानगीशिवाय औषध विक्रीदेखील केली. याबाबत तिघांवर गुन्हा दाखल केला असून, एकास अटक केली आहे.
श्रीराम बालाजी रुपनर (रा. थेरगाव, मूळ रा. लातूर) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह गोविंद मनोहर पांचगे (रा. थेरगाव, मूळ रा. कर्नाटक) आणि सोपान माळी (रा. भुसावळ, जळगाव) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अन्न व औषध विभागाच्या निरीक्षक भाग्यश्री यादव यांनी बुधवारी (दि. ४) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अन्न व औषध विभागाने सदाशिव पेठ येथील कैलास इंटरप्रायझेस या घाऊक औषध दुकानाची Mephentermine Sulphate Injection IP या औषधांच्या खरेदी विक्रीबाबत तपासणी केली. त्यानुसार फिर्यादी यादव यांनी पुनावळे मेडिकल ( पुनावळे ) या मेडिकल दुकानात तपासणी केली असता औषधाची खरेदी केली नसल्याचे समोर आले. कैलास इंटरप्रायझेस या घाऊक ख औषधविक्री करणाऱ्या दुकानात पुनावळे मेडिकलच्या नावाने विक्री शिक्का मारलेली प्रत दिल्याचे दिसले. त्यानुसार दुकानातील सीसीटीसी यांची तपासली करण्यात आली. त्या वेळी त्यांचा मित्र आरोपी श्रीराम रुपनर याने त्याच्या गोविंद पाचंगे याच्यासह मिळून पुनावळे मेडिकलच्या नावाने संबंधित औषधांची खरेदी केली असल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर शिवाजीनगर येथील आरती फार्मा या घाऊक औषधविक्री करणाऱ्या दुकानातदेखील आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे वरील औषधांची खरेदी केल्याचे आढळले.
आरोपी औषध खरेदी विक्रीचे काम करत होता. तो दुकानाचे भागीदार शरद गीते यांचा कॉलेजमधील मित्र होता. औषध प्रशासनाने आरोपीकडे चौकशी केली असता औषधाचा थेरगाव येथे साठा केल्याचे मान्य केले. तसेच त्याने काही औषधे भुसावळ येथील आरोपी सोपान माळी याला विकल्याचेही सांगितले. प्रशासनाने त्याच्याकडून २९० बाटल्या जप्त केल्या. पोलिसांनी तिघांवर भारतीय दंड विधानानुसार तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. रुपनर याला अटक केली असून, वाकड पोलीस तपास करीत आहेत.













