न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मार्च २०२०) :- पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून १९७२ ते १९८३ पर्यंत संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना ६. २५ टक्के एवढी जमीन परतावा स्वरूपात दिली जाणार आहे. वाटप करण्यात येणाऱ्या संबंधित जमिनीसाठी २ चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर केला जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव प्राधिकरणाच्या आगामी सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
प्राधिकरणाने १९७२ ते १९८३ या कालावधीत ज्या जमिनी संपादित केल्या. त्यांना परतावा देण्याचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. संबंधित शेतक-यांना ६२ हेक्टर इतकी जमीन द्यावी लागणार आहे. मात्र, प्राधिकरणाकडे एवढी जमीन नसल्याने त्यांना परतावा स्वरूपात साडेबारा टके जमीन परतावा देण्याऐवजी ६. २५ टके इतकी जमीन दिली जाणार आहे. तसेच, वाटप करण्यात येणाऱ्या संबंधित जमिनीसाठी २ चटई क्षेत्र निर्देशांक दिला जाणार आहे.
राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे प्राधिकरणास याबाबतचे आदेश ३० जुलै २०१९ ला देण्यात आले. त्यासाठी प्राधिकरणाच्या विकास नियंत्रण नियमावलीत सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याबाबत देखील सूचना केलेल्या आहे. त्यानुसार प्राधिकरणाकडून अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष परताव्यापासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.















