न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२०) :- पुण्याहून काळेवाडी, डांगे चौकाकडे जाणाऱ्या वाहनांच्या सोयीसाठी जगताप डेअरी चौकातील पिंपरी चिंचवड नवनगरविकास प्राधिकरणाकडून बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उदघाटन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर माई उर्फ उषा ढोरे यांच्या हस्ते सोमवार दि. ०९ / ०३ / २०२० रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले. गेल्या वर्षी प्राधिकरणाकडून दोन पुलांपैकी काळेवाडीकडून पुण्याकडे जाणारा एक पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. या ७०० मीटर लांबी आणि ८ मीटर रुदी असलेल्या पुण्याकडून काळेवाडी, डांगे चौकाकडे जाणाऱ्या पुलाचे काम फेब्रुवारी महिन्यात पूर्ण करण्यात आले असून, हा मार्ग खुला करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. पुण्याकडून काळेवाडी, डांगे चौकाकडे जाण्याऱ्या वाहनांना जगताप डेअरी चौकामधून वळसा मारून जावे लागत होते. याचा परिणाम म्हणून वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. तसेच, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत महापालिकेचे पदाधिकारी तसेच स्थानिक नगरसेवक प्राधिकरणाकडे पूल खुला करण्याची मागणी गेली दोन महिनेपासून सातत्याने करीत होते. परंतू, प्राधिकरणाकडून निर्णय घेण्यास विलंब होत असल्याने महापालिकेच्या पदाधिका-यांनी सोमवारी हा पुल वाहतुकीसाठी खुला केला. तथापि प्राधिकरणाने राष्ट्रवादी च्या दबावाखाली येत उद्घाटन करुन नागरिकांसाठी खुला केलेला पूल पुन्हा राडारोडा टाकून बंद केलेला आहे. या संदर्भात राष्ट्रवादीने भाजपावर हे उद्घाटन श्रेयासाठी केले असा आरोप केला आहे. परंतु, वस्तुत: हया पुलाचे काम देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच झालेले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी या दोन महिन्याच्या काळात अनेक खासगी कामांची उद्घाटने केली आहेत. त्यांना जर याबाबत कळवळा होता तर त्यांनी त्या वेळेस नागरिकांच्या हिताचा विचार करुन पूल वाहतुकीसाठी खुला करणे आवश्यक होते. परंतु, आम्ही महापौरांसोबत पुलाची समक्ष पाहणी करण्यासाठी गेलो असता पुलाचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याचे निदर्शनास आल्याने कोणत्याही प्रकारच्या उद्घाटन सोहळयाचे आयोजन न करता तसेच भाजपाच्या कोणत्याही वरीष्ठ नेत्याना न बोलवता फक्त नागरी हिताचा विचार करुन तातडीने सदरचा पूल नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करुन दिला आहे. यामध्ये आमचा कसलेही श्रेय घेण्याचा इरादा नाही. ‘पिंपरी चिंचवड नवनगरविकास प्राधिकरणाने सदर पूल राडारोडा टाकून वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे आम्ही आज दि. ११ / ०३ / २०२० रोजी जगताप डेअरी पुल येथे प्राधिकरण प्रशासनाचा निषेध केला आहे. जगताप डेअरी येथील काम पूर्ण झालेला पूल पिंपरी चिंचवड नवनगरविकास प्राधिकरणाने येत्या दोन दिवसांत नागरिकांसाठी खुला करावा, अन्यथा दोन दिवसानंतर पूल नागरिकांना वाहतुकीसाठी खुला केला नाही तर पिंपरी चिंचवड शहर भाजपाच्या वतीने पुन्हा तीव्र आंदोलन करुन सदरचा पूल नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करुन देण्यात येणार आहे.
यावेळी तुषार हिंगे (उपमहापौर), नामदेव ढाके (सत्तारुढ पक्षनेता), उषा उर्फ माई ढोरे ( महापौर ), अभिषेक बारणे ( नगरसेवक ) तुषार कामठे ( नगरसेवक ). बापू काटे ( नगरसेवक ), विनायक गायकवाड ( मा . नगरसेवक ), निर्मला कुटे ( नगरसेविका ), चंद्रकांत नखाते ( नगरसेवक ), आरती चौधे ( नगरसेविका ), ममता गायकवाड ( नगरसेविका ), सविता खुळे ( नगरसेविका ), उषा मुंढे ( नगरसेविका ) उपस्थित होते.















