न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मार्च. २०२०) :- नगरसेवक प्रवीण भालेकर युवा मंच व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन च्या वतीने जागतिक महिलादिनाचे औचित्य साधत, रुपीनगर, ताम्हणेवस्ती, तळवडे, त्रिवेणीनगर परिसरातील महिलांसाठी मोफत तपासणी व चष्मे वाटपाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
नगरसेवक प्रवीण भालेकर यांच्या रुपीनगर जनसंपर्क कार्यालयात नुकतेच हे शिबिर संपन्न झाले. या तपासणी शिबिरात परिसरातील सुमारे ४०० महिलांनी नेत्र तपासणी करून घेतली. शिबिरामध्ये महिलांना अल्प दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात आले.
प्रवीण भालेकर म्हणाले की, महिला आपल्या आरोग्याची काळजी व्यवस्थितपणे घेत नसल्याने महिलांमध्ये जास्त आरोग्याच्या समस्या दिसून येतात. संपूर्ण घराची काळजी घेता-घेता महिला स्व:ताच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. याच समस्या नंतर अधिक गंभीर होतात. त्यामुळेच वेळीच अशा समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे. काही आजारांचे संकेत शरीर देत असते. हे संकेत, लक्षणे ओळखून महिलांनी तातडीने डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतली पाहिजे. काही लक्षणे अशी असतात ज्यांचे रूपांतर नंतर मोठ्या आजारात होऊ शकते. त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माया भालेकर, सविता सोनवणे, चंद्रशेखर कडलग, राम पडघन, संजय लोकरे, समाधान घुले, तेजस घोडके व आदींनी परिश्रम घेतले.















