- परिसरातील नागरिकांचा विरोध; तीव्र आंदोलनाचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२०) :- कोरोनाच्या संशयितांना घरकुलमध्ये ठेवण्यात येणार असल्याच्या अफवेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या ठिकाणी परदेशवारी करून आलेल्यांची सोय करू नये, अशी मागणी करत नागरिकांनी गोंधळ घातला. याबाबत तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून परत आलेल्या शहरातील नागरिकांची स्वतंत्र सोय केली जात आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चिखली घरकूल येथे शनिवारी (दि. १४) पाहणी केली. याबाबत माहिती मिळताच नागरिकांनी एकत्र येत परदेशवारी करून आलेल्यांना घरकुलमध्ये ठेवण्यास तीव्र विरोध केला. संबंधितांची इतरत्र सोय करावी अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, या ठिकाणी केवळ परदेशातून जाऊन आलेल्या नागरिकांची तात्पुरती सोय केली जाणार असल्याची माहिती आयुक्त हर्डीकर यांनी दिली. संशयित किंवा कोरोनाग्रस्तांना या ठिकाणी ठेवणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनामुळे परदेशातून परतलेल्यांची सोय तात्पुरत्या स्वरूपात इतर ठिकाणी करावी लागणार आहे. याबाबत आम्ही घरकुलमधील रिकाम्या इमारतींची पाहणी केली. या इमारतीमध्ये संशयित अथवा कोरोनाची लागण झालेले रुग्ण ठेवले जाणार नाहीत. जे केवळ परदेशात जाऊन आलेले आहेत, त्यांना येथे ठेवून त्यांच्यावर काही दिवस देखरेख ठेवली जाणार आहे. त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी सोडले जाईल. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.
– श्रावण हर्डीकर, महापालिका आयुक्त.












