न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२०) :- जनता कर्फ्यूची मागणी मी आज देशवासीयांकडे करतो आहे. जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध. त्याचे पालन प्रत्येक नागरिकाने याचे पालन करावे अशी मागणी मी करतो आहे.
२२ मार्चला सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत कुणीही बाहेर पडू नये असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे असंही मोदींनी स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारांनीही हा आदेश पाळावा असंही मोदींनी म्हटलं आहे.
करोना नावाच्या संकटाने जगाला ग्रासलं आहे. जगातल्या सगळ्या मानवजातीला करोनाचा त्रास होतो आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळीही जगातल्या सगळ्या देशांवर इतका गंभीर परिणाम झाला नव्हता जेवढा करोनामुळे होतो आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मागच्या दोन महिन्यांपासून आपण करोनाबाबत विविध बातम्या ऐकतो आहोत आणि पाहतो आहोत. भारतीयांनी करोनाचा प्रभावीपणे सामना केला याचं मला कौतुक आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.













