न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२०) :- आपल्या शहराला निरोगी ठेवायचे असेल तर आपल्या सर्वांचा महत्वपूर्ण सहभाग आणि सहकार्य आवश्यक आहे. आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी दि. २२ मार्च २०२० रोजी जनता कर्फ्यू ची हाक दिली आहे. आपण सर्वजण या आवाहनाला प्रतिसाद देऊन करोना विषाणू संसर्गाला रोखण्याचा संकल्प करूया, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता ज्या व्यक्तींना होम क्वारन्टाईन राहण्याचा सल्ला दिला आहे त्यांनी स्वत:हूनच घरी रहावे. त्यामुळे स्वत: बरोबरच इतरांची काळजी त्यांनी घेतल्यास कोरोना विषाणू संसर्ग फैलावणार नाही. या व्यक्तींनी परिसरात किंवा इतरत्र फिरू नये असे महापौर ढोरे यांनी सांगितले आहे. ज्या व्यक्तींमध्ये सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळून आली असेल तर त्यांनी वैद्यकीय केंद्राशी संपर्क साधून उपचार घ्यावेत आणि त्यांनी सांगितलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी असे महापौर ढोरे म्हणाल्या.
कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. शिवाय विविध माध्यमांद्वारे जनजागृती देखील महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. कोरोना आजारा संदर्भात केंद्र शासन, राज्य शासन आणि महापालिकेच्या वतीने दिल्या जाणा-या मार्गदर्शक सुचना आणि आदेशांचे पालन करून नागरिकांनी कोरोनाच्या संकटाचा धैर्याने सामना करावा असे आवाहन महापौर ढोरे यांनी केले.















