न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२०) :- गुरुवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास फिर्यादी चंद्रकला आणि त्यांची मुलगी घरी जात होत्या. ओटास्किम येथे संजयनगर समाज मंदिराच्या मागे आरोपी जावई बाबासाहेब आणि त्याची आई सुमन या दोघांनी फिर्यादी यांना अडवले. फिर्यादी आणि त्यांच्या मुलीला ‘माझ्या विरोधात पोलिसात अर्ज का केला’, असे म्हणत शिवीगाळ केली.
बाबासाहेब याने फरशीचा तुकडा चंद्रकला यांच्या डोक्यात मारला. तर बाबासाहेबच्या आईने फिर्यादी यांच्या मांडीला चावा घेऊन जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. १९) दुपारी सव्वाबारा वाजता ओटास्कीम निगडी येथे घडली. या प्रकरणी चंद्रकला मगर सरोदे (वय ५५, रा. ओटास्किम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे.
बाबासाहेब कांबळे (वय ३७) असे अटक केलेल्या जावयाचे नाव आहे. त्याच्यासह त्याची आई सुमन कांबळे (वय ५०, दोघे रा. ओटास्किम, निगडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.















