न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- चिंचवड शहराला भेडसावणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांवर भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी निगडी येथील महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात आयुक्त श्रावण हर्डीकर व पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोमवारी (दि. २९) रोजी बैठक घेतली. दोन तास चाललेल्या या बैठकीत शहराला पाण्याचा पुरवठा कमी का होतो, याची त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पाणी सोडणारे कर्मचारी आणि अधिकारी पाण्याचे योग्य नियोजन करून पुरवठा करत नसल्यास अशांवर कारवाई करावी.
तसेच, सणासुदीच्या काळात संपूर्ण शहराला सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी स्वतः आयुक्तांनी लक्ष घालून तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आदेश आमदार जगताप यांनी दिले. त्याचप्रमाणे पवना, आंद्रा तसेच भामा-आसखेड धरणातून मंजूर झालेला सुमारे १४९ दशलक्ष घनमीटर पाण्याचा कोटा पिंपरी-चिंचवड शहरात आणण्याच्या उद्देशाने प्रशासनाने कार्यवाही पूर्ण करावी, असेही त्यांनी आयुक्तांना सांगितले.
गेल्या महिनाभरापासून शहराला अनियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न भेडसावत आहे. नागरिक व नगरसेवकांच्या तक्रारी येऊनही हा प्रश्न सुटत नसल्याने भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी सोमवारी आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. निगडी, सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रात ही बैठक झाली. यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक नामदेव ढाके, विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम, रामदास तांबे, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांच्यासह या विभागाचे सर्व अभियंते उपस्थित होते.
आता दिवाळी तोंडावर आली आहे. शहरवासीयांना पिण्याचे पाणी कमी पडता कामा नये. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून संपूर्ण शहराला पाणीपुरवठा होतो की नाही, याची दररोज माहिती घ्यावी. जेथे पाणी येत नाही, तेथे आवश्यक त्या उपाययोजना करून पाणी उपलब्ध करून द्यावे. कोणत्याही परिस्थितीत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झालाच पाहिजे, असे त्यांनी आयुक्तांना बजावून सांगितले.