न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करोना (कोविड-१९) बाबत नागरिकांमध्ये जागृती करणेकामी विविध प्रसार माध्यमांचा प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. मनपाच्या फेसबुक व व्टिटर पेजव्दारे करोनाबाबत केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त जनजागृतीपर माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येत आहे.
तसेच महापौर उषा उर्फ माई ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार आण्णा बनसोडे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे तसेच सिनेअभिनेते पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, संजय मोने, अतुल परचुरे, अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी, भार्गवी चिरमुले यांनी व्हिडीओ क्लिप व्दारे पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांना करोना विषाणूबाबत घाबरुन न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच करोना विषाणू बचाव करण्यासाठी #coronapcmc या हॉशटॅगव्दारे प्रशासनामार्फत निर्देशित केलेल्या सुचना व आदेशांचे पालन करण्याचे आवाहन ही शहरवासीयांना करण्यात येत आहे.
नागरिकांचा मनपाच्या फेसबुक व व्टिटर पेजला नागरिकांचा मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून मनपामार्फत करण्यात येणारे आवाहन नागरिकांकडून शेअर करण्यात येत आहे. सदरची माहिती अधिक शेअर करण्याचे अवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे. शहरातील विविध रेडिओ वाहिन्यांव्दारे देखील महानगरपालिकेमार्फत नारिकांना करोना विषाणूपासून बचावासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती देणेत येत आहे व नागरिकांना घाबरुन न जाता काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.
नागरिकांना करोना विषाणूपासून घ्यावयाच्या काळजीबाबतची माहिती देण्यासाठी शहरातील विविध भागांमध्ये मनपाच्या कचरा गाडया व रिक्षांवरील भोंग्याव्दारे जागृती करण्यात येत आहे. पिं.चिं.मनपामार्फत कार्यान्वित करण्यात आलेल्या ८८८८००६६६६ या हेल्पलाइन क्रमांकावर नागरीक करोनाविषयक शंका निरसन करुन घेत आहेत. तसेच परदेशातून आलेल्या नागरिकांबाबत माहिती प्राप्त होत असून त्यावर प्रशासनामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे.















