न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून दि. २० /०३/ २०२० पर्यंत एकुण १०५ व्यक्तींचे कोरोना (कोविड १९) करीता घश्यातील द्रव्यांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरामधील कोरोना (कोविड १९) या आजाराच्या एकुण रुग्णांची संख्या १२ झालेली आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांचेवर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयांमधील आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत.
करोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड मनपामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या २४४ कर्मचारी यांची क्षेत्रीय सर्वेक्षण टिम घरोघरी जाऊन सर्वेक्षण करित आहेत. दि.२०/०३/२०२० अखेर शहरातील ७४९९८ घरांमधील २४९२१८ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आलेले असून पिंपरी चिंचवड मनपामध्ये आज अखेर ६१३ बाहेर देशातून आलेल्या प्रवाश्यांना घरातील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील उद्योजकांची आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बैठक घेवून करोना विषाणूचा प्रसार थांबविण्याकरीता प्रशासनाने निर्गमित केलेले सुचना व आदेशांचे पालन करण्याचे आवाहन केले. कोरोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वतीने सर्व नागरिकांना
आवाहन करण्यात येते की अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच फ्लुसारखी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी.
परदेश प्रवास करुन चीन, डेमोक्रेटिक रिपब्लीक ऑफ कोरिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इरान, दुबई, सौदी अरेबिया, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कतार, ओमान, कुवेत आणि युनाटेड अरब अमिरात या देशांमधुन आलेल्या सर्व नागरिकांनी किमान १४ दिवस स्वत:हून घरांमध्येच (Home Quarantine) मध्ये रहावे. उपरोक्त नमूद देशांमधून प्रवास करुन आलेल्या नागरिकांनी याबाबतची माहिती आपल्या घराजवळील महापालिकेच्या दवाखाना किंवा रुग्णालयात तातडीने द्यावी असे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
पिं.चिं. मनपामार्फत हेल्प लाईन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सदर हेल्पलाईन क्रमांक ८८८८००६६६६ हा आहे. तसेच ९९२२५०१४५० हा Whatsapp क्रमांक कार्यान्वित करण्यात आलेला आहे. राज्य शासनामार्फत कार्यान्वित idsp.mkcl.org या संकेतस्थळावर संशयित कोरोना रुग्ण संबंधित माहिती देण्याचे आवाहन नागरीक तथा सर्व वैद्यकीय व्यावसायिक यांना करण्यात येत आहे.















