न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात रविवारी सकाळपासून आगीच्या दोन मोठ्या घटना घडल्या. पहिली घटना सकाळी ९.३० वाजता चिंचवड स्टेशन येथील महिंद्रा कंपनीमध्ये घडली. तर दुसरी घटना देहू आळंदी रोडवरील हरगुडे वस्ती, चिखली येथे घडली.
मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशन येथील संघवी केसरी कंपाऊंडजवळ असलेल्या महिंद्रा कंपनीत आग लागल्याची माहिती सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार चार बंब घटनास्थळी दाखल झाले. दीड तासात ही आग आटोक्यात आली.
अग्निशामक दल चिंचवड स्टेशन येथे असतानाच देहू आळंदी रस्त्यावरील हरगुडे वस्ती, चिखली या ठिकाणीही आग लागल्याची वर्दी अग्निशामक दलास मिळाली होती. त्या आगीच्या घटनेवरही अग्निशामक विभागास नियंत्रण मिळविण्यास यश आले.















