न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२०) :- कोरोना विषाणूला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभर आज (रविवार) पाळण्यात येत असलेल्या ‘जनता कर्फ्यू’ला आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत पिंपरी-चिंचवडकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला आहे. स्वयंस्फूर्त संचारबंदीमुळे शहरातील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट अनुभवायला मिळला आहे.
मॉर्निंग वॉकला येणाऱ्या हजारो नागरिकांमुळे सकाळी गजबजणाऱ्या निगडी येथील दुर्गादेवी टेकडीवर देखील आज पहाटे लवकर गर्दी झाली. पहाटे लवकर मॉर्निंग वॉक व व्यायाम करून सातच्या आत घरी परत जाण्यास नागरिकांनी पसंती दिली तर काहीजणांनी आज मॉर्निंग वॉकला सुट्टी घेतली. काळेवाडी- रहाटणी परीसरात जनता कर्फ्युला नागरीक आणी व्यापाऱ्यांकडून उस्फुर्त प्रतीसाद मिळाला. सर्व रस्ते निर्जन झालेले होते. दुकाने बंद होते. दुध वितरक आणि वृत्तपत्र विक्रेत्यांनी सकाळी सातपूर्वी ग्राहकांच्या घरी दूध व वृत्तपत्रे पोहचविण्याची व्यवस्था केली होती.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कंपन्या, उद्योग, व्यवसाय, दुकाने बंद असल्यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या कामगारांची लगबग व गर्दी कोठेही दिसत नव्हती. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही बंद ठेवण्यात आली आहे. रिक्षा व टॅक्सी देखील पाहायला मिळत नाहीत. चौकाचौकांमध्ये पोलीस कर्मचारी पाहायला मिळाले. खासगी दुचाकी किंवा खासगी मोटारींची अत्यंत तुरळक वाहतूक पाहायला मिळली. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे तपासून सोडण्यात येत होते. कोरोनाच्या संकटाची पुरेशी जाणीव झाली असल्यामुळे शहरातील नागरिकांकडून आज सायंकाळी पाचनंतरही जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी आशा करूयात.















