न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मार्च २०२०) :- देशात करोनाचा संसर्ग झपाट्यानं पसरत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीनं लॉकडाउनची घोषणा केली. त्याचबरोबर हा संकटाचा काळ असून कुणीही घराबाहेर पडू नये. गर्दीचे कार्यक्रम टाळा असं आवाहन मोदी यांनी केलं होतं.
पण, भाजपा आमदारानेच लॉकडाउनला ठेंगा दाखवला आहे. कळस म्हणजे तीन हजार पाहुण्यांमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची विशेष उपस्थिती होती. करोनाचं संकट टळेपर्यंत लग्न सोहळे आयोजित करून नका, असं आवाहन करणाऱ्या येडियुरप्पा यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे.
देशात लॉकडाउन लागू झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी राज्यातील जनतेला सर्व लग्न सोहळे पुढे ढकलण्याचं आवाहन केलं होतं. हे संकट टळेपर्यंत विवाह टाळावे, असं त्यांनी म्हटलं होतं. तेच येडियुरप्पा आता चर्चेत आले आहेत. देशात लॉकडाउन असताना कर्नाटकातील भाजपाचे आमदार महंतेश कवतागिमठ यांनी आपल्या मुलीचं थाटात लग्न लावून दिलं. बेळगावमध्ये रविवारी हा लग्नसोहळा पार पडला. ‘द हिंदू’ दैनिकानं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.


















