इरफान सय्यद यांच्या मागणीला अनुसरून खा. बारणे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मार्च २०२०) :- कोरोना विषाणू या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २१ दिवसाचे लाॅकडाऊन जाहिर केले आहे. देशासह राज्यातील नागरीक प्रथम कर्तव्य समजून या आदेशाचे पालन करीत, घरात वास्तव्यास आहेत. पर्यायाने महाराष्ट्रातील हातावर पोट असणारा असंघटीत बांधकाम कामगारसुद्धा सरकारी आदेशाचं तंतोतंत पालन करीत आहे. मात्र, या बांधकाम कामगाराला भ्रांत आहे ती दोन वेळच्या जेवणाची. ही गरज घरात बसून पूर्ण होणार नाही. कोरोनामुळे आज राज्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारा हा कामगार रोजगाराअभावी घरात उपाशी मरत आहे. त्यामुळे शासनाने सहानुभूतीपूर्वक या बांधकाम कामगारांचा विचार करून किमान दोन वेळच्या जेवणासाठी या कामगारांच्या खात्यावर विशेष अनुदान म्हणून सरसकट दहा हजार रुपये एवढी रक्कम जमा करावी. अशी मागणी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे व संघटनेच्या माध्यमातून मागणी लावूनही धरली आहे.
या मागणीला मावळ लोकसभेचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनीही अधिकृत दुजोरा देत, कामगार नेते इरफान सय्यद यांची मागणी किती रास्त आहे, हे पटवून देण्याकरीता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. याद्वारे त्यांनी पुणे, पिंपरी चिंचवडसह अखंड महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांची व्यथाच मुख्यमंत्र्यांपुढे मांडली आहे. त्यामुळे या लॉकडाऊन परिस्थितीत बांधकाम कामगारांच्या उदरनिर्वाहासाठी महाराष्ट्र मजुर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इरफान सय्यद यांच्या मागणीला अनुसरून ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण महामंडळ’ अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांच्या खात्यात रक्कम रूपये १००००/- एवढी रक्कम जमा करण्यात यावी, अशी विनंतीवजा मागणी खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या संसर्गरोगामुळे देशभर राज्यभर लॉकडाऊन केले आहे. इमारत व इतर बांधकाम कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याकारणाने या कामगाराच्या कुंटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. बांधकाम कामगार कल्याण महामंडळ अंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी करणेत आली असून, त्याची संख्या १३ लाख इतकी आहे. राज्य सरकारच्या आखत्यारीत असणाऱ्या बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे शेष निधी जमा आहे. या निधीचा वापर संकटकाळी कामगारासाठी करण्यात येतो, असेही बारणे यांनी म्हटले.
पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या माध्यमातून २५ हजार नोंदणीधारक बांधकाम कामगार आहेत. सदरची परिस्थिती पाहता देशातील २१ दिवसाच्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर या कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्र मजदुर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इरफान सय्यद यांनी आपणांस व कामगार मंत्री तथा कामगार आयुक्त यांना पत्र देवून कामगाराच्या व्यथा मांडल्या आहेत. इरफान सय्यद हे शिवसेनेशी संलग्न भारतीय कामगार सेनेचे प्रतिनिधीत्व करतात. मा. साहेब माझी आपणांस विनंती की, या संदर्भात आपण जातीने लक्ष घालुन नोंदणीकृत बांधकाम कामगार संघटनेने मागणी केल्याप्रमाणे कामगार खात्यामध्ये या निधीतील रक्कम जमा करण्यात यावी, असे या पत्रात खासदार बारणे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्यात ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण महामंडळ’ अंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी केली जाते. या मंडळा अंतर्गत नोंदीत जिवित बांधकाम कामगारांची संख्या १३ लाख ऐवढी आहे. कष्ट व मोलमजुरी करून रोजचे रोज हातावर पोट असणा-या या बांधकाम कामगारावर आज उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन आदेशाचे पालन करत त्यांना घरातच राहावे लागत आहे. कामगारांच्या कल्याणासाठी मंडळाकडे सेस (निधी) जमा आहे. संकटाच्या या कठीण काळात महामंडळाने नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मात्र, महामंडळ आपली जबबदारी झटकत आहे. त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून कामगारांसाठी आमचा लढा सुरूच आहे. मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे कामगारांची बाजू लावून धरली आहे. कामगारांना न्याय मिळावा म्हणून ते शासनदरबारी आमच्या संघटनेची बाजू लावून धरीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने त्यांच्या भूमिकेचे मी स्वागत करतो. शासनाने या हातावरील पोट असणाऱ्या बांधकाम कामगारांच्या बँक खात्यावर लवकरात लवकर दहा हजार रुपयांचे विशेष अनुदान सरसकट जमा करावे. जेणेकरून या कामगारांची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत संपुष्टात येईल व त्यांना कोरोना युद्धासाठी सज्ज होता येईल. – इरफान सय्यद (संस्थापक/अध्यक्ष – महाराष्ट्र मजदूर संघटना).


















