न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ एप्रिल २०२०) :- पिंपरी-चिंचवडमध्ये २१ दिवसांचे लॉकडाऊन सुरू आहे. तुम्ही बाहेर पडू नका, तुमची जबाबदारी आम्ही घेत आहे, असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष आ. महेश लांडगे यांनी करून भोसरी विधानसभा मतदारसंघातील विविध प्रभागात ट्रॅक्टरच्या माध्यमातून औषध फवारणी केली.
ट्रॅक्टरचे सारथ्य स्वतः आ. लांडगे यांनी केले. प्रभाग क्रमांक ६ पासून आ. लांडगे यांनी ट्रॅक्टरवरून औषध फवारणी सरू केली. या वेळी मनपा शहर सुधार समितीचे चेअरमन व भोसरी चऱ्होली मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र लांडगे उपस्थित होते.
राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पिंपरी – चिंचवडमध्ये एकूण १४ पैकी १० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज दिला आहे. त्या मनपा प्रशासनाने केलेली उपाययोजना आणि त्यांना शहरवासीयांनी दिलेला प्रतिसाद यामुळे हे यश मिळत असल्याची चर्चा शहरात आहे. शहरातील सर्वच पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या दृष्टीने माणुसकीचे दर्शन दाखवून दिले आहे. त्या अनुषंगाने औषध फवारणीसाठी प्रत्येक जण सरसावले आहे. त्यादृष्टीने लोकप्रतिनिधी स्वतः त्यामध्ये सहभागी झाल्याने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून गोष्टीचे समाधान व्यक्त करण्यात येऊ लागले आहे.












