न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ एप्रिल २०२०) :- सध्या संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहे. असे असताना वाकड परिसरात अंदाजे २५-२६ वयाच्या दोन तरुणी घराबाहेर पडल्या. त्यानंतर त्या दोघी केक घेऊन जाताना पोलिसांच्या नजरेस पडल्या. पोलिसांनी त्यांना घराबाहेर फिरण्याचे कारण विचारले. मात्र, कारण न सांगता तरुणींनी सरळ पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली.
बराच वेळ हुज्जत घातल्यानंतर वाकड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तरुणींवर गुन्हा दाखल करा, असे पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले. गुन्हा दाखल होण्याचे ऐकताच तरुणींनी लगेच नरमाईची भूमिका घेतली.
मात्र, पोलिसांपुढे हुज्जतीनंतरच्या माफीचा काहीही उपयोग झाला नाही. हा प्रकार बुधवारी ( दि.१) सकाळी वाकड परिसरात घडला. दोन्ही तरुणींवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे वाढदिवसाचा केक आणणे तरुणींना चांगलेच महागात पडले आहे.












