- आनंदनगर झोपडपट्टीतील गोरगरीबांना मिळाला जीवनावश्यक वस्तूंचा आधार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ एप्रिल २०२०) :- कोरोना विषाणू व लॉकडाऊनमुळे पिंपरी चिंचवड शहरात हातावरील पोट असणाऱ्या सर्वसामान्यांची दैना उडाली आहे. घरातील राशन संपल्यामुळे हे नागरिक कोरोनाचा धोका ओळखूनही अन्नासाठी रस्त्यावर इतरात्र फिरताना आढळून येत आहेत. शहरात सर्वत्रच अशी परिस्थिती दिसून येत आहे. त्या-त्या ठिकाणी त्यांना थोडीफार मदत मिळतेही. मात्र, हे कुठवर चालायचे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील एम्पायर इस्टेट सोसायटीने शहरात आदर्श घालवून दिला आहे. नगरसेवक शैलेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीतील रहिवाशांनी दानशूर व्यक्तींकडून देणग्या मिळवून त्याद्वारे साहित्याची जुळवाजुळव करून, चिंचवड स्टेशन परिसरातील वाटपासाठी पुढाकार घेतला आहे.
नगरसेवक शैलेश मोरे यांनी माहिती देताना सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरात लॉकडाऊनमुळे गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. नागरिकांना अक्षरशः अन्नासाठी भटकंती करावी लागत आहे. लॉकडाऊनमुळे झोपडपट्टी परिसरात तर आणखीनच खराब अवस्था आहे. एका वेळेचे जेवणही त्यांना मिळणे मुश्कील आहे. आमच्या माध्यमातून रोज दोन वेळा साधारण तीनशे नागरिकांची जेवणाची व्यवस्था आठ दिवसापासून प्रभागात सुरु आहे. परंतु, हे सतत सुरु राहिले पाहिजे, यासाठी मी व आमच्या एम्पायर इस्टेट सोसायटीतील सदस्यांनी पुढाकार घेत तसेच रांका ज्वेलर्सचे तेजपाल रांका, आकुर्डीतील संत मोनी बाबा आश्रमचे जसविंदरसिंग सोखी, विशाल तेजवानी यांच्या सहकार्याने मोठ्या स्वरूपावर देणगी जमा करून, त्याद्वारे २५०० किलो तांदूळ, ८०० किलो डाळ, ८०० तेल पॅकेट, ८०० मीठाचे पाकिटे हा किराणा माल खरेदी केला व त्या वस्तूंचे ठराविक किलोमध्ये कीट करून, साधारण एक हजार नागरिकांना आठवडाभर पुरेल अशी व्यवस्था केली. लवकरच हे तयार वस्तूंचे कीट प्रभागातील आनंदनगर व परिसरात वाटप करणार आहोत, असेही मोरे म्हणाले.
मुळात शहरावर एवढे मोठे संकट आलेले असताना आमच्या एम्पायर इस्टेट सोसायटीतील रहिवाश्यांनी पळ काढला नाही. सोशल डिशटींक्शनचे नियम पाळून घरात बसून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांचा विचार केला. त्यांच्या मदतीला वस्तुरूपाने धावून आले. याकामी आमच्या सोसायटीतील नागरिक व फेडरेशन १ च्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानावयास हवे. एम्पायरचा आदर्श ठेवून शहरातील इतर सोसायट्यांनी देखील जमेल तेवढी मदत केल्यास शहरातील गोरगरिबांची सोय होईल. तसेच हे नागरिक रस्यावर न येता घरात बसून कोरोनाचा संसर्ग टाळतील, असे नगरसेवक मोरे म्हणाले.












