- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप काटे यांचे शहरवासियांना मंत्र अंगीकारण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ एप्रिल २०२०) :- कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर लोकांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशवासीयांकडे ९ मिनिटांचा वेळ मागितला आणि ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता आपल्या घराबाहेर दिवा पेटवण्याचं आवाहन केलं. मात्र, याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीसह इतर पक्षांकडून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका होत आहे. मुळात देशावर कोरोनाचे संकट गडद होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आशादायक चित्र दाखविले जाईल, अशी अपेक्षा जनतेची होती. मात्र, पंतप्रधानांनी यावर काहीच न बोलता, ‘येत्या रविवारी नऊ वाजता, घरोघरी अंधार करून, दिवे लावा’ अशी मुक्ताफळे उधळून देशाला मुर्खात काढले आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर व पर्यायाने भाजपवर केला आहे. सोशल मिडीयावर देखील याच्या विरोधात मोठी नाराजगी जाहीर केली जात आहे. आता, याचे लोन पिंपरी चिंचवड शहरात देखील दाखल झाले असून, शहर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी ‘मी माझ्या घरातील लाईट चालू ठेवणार आणि एकही दिवा पेटवणार नाही. कारण मी मूर्ख नाही’, अशी भूमिका घेत पंतप्रधानांच्या आवाहनास खो दिला आहे.
याबाबत बोलताना संदीप काटे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाच्या महासाथीविरोधात देशवासीयांना पुन्हा एकत्र येत, रविवारी पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी घरातील दिवे बंद करावेत व मेणबत्ती, मोबाइलचा दिवा वा बॅटरीचा दिवा लावून दिव्यांचा झगमगाट करावा, असं आवाहन केलं आहे. मात्र ही खुळचट कल्पना आहे. पंतप्रधानांकडून ‘भारताने कोरोनाविरुद्धची लस शोधली, एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत. कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही’, असे भाषण अपेक्षित होते. मात्र, मोदी उजेड आणण्याची गरज असताना, अंधार करा म्हणतात, हा बालिशपणा नाही तर काय आहे. मुळात याला काही शास्रीय आधारही नाही. उलट असे केल्याने देशावरच मोठे संकट कोसळू शकते.
याच प्रश्नावर सध्या देशामधील वीजनिर्मिती करणाऱ्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आणि इंजिनियर्स व खुद्द महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही प्रकाशझोत टाकला आहे. अशाप्रकारे एकाच वेळेस लाईट बंद केल्यास ट्रिप होऊन सेंट्रल ग्रीड निकामी होईल आणि राज्यासहीत संपूर्ण देश अंधारात जाईल अशी भिती व्यक्त केली आहे. “हे म्हणजे गाडी वेगाने सुरु असतानाच ब्रेक लावण्यासारखं किंवा अचानक अँक्सेलेटर देण्यासारखं आहे. अशान संपूर्ण देशाला वीज पुरवठा करणाऱ्या नेशनल पावर ग्रीडला धोका पोहचून ती बंद पडण्याचा किंवा तांत्रिक बिघाड होण्याची शक्यताच अधिक आहे. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या आवाहनास प्रतिसाद न देता, ‘मी माझ्या घरातील लाईट चालू ठेवणार आणि एकही दिवा पेटवणार नाही. कारण मी मूर्ख नाही’.
शहरातील नागरिकांनी देखील या आवाहनास प्रतिसाद न देता, अंधश्रद्धा न बाळगता, उद्या रविवारी रात्री ९ वाजता आपली वीज बंद करू नये, अशाने आपणच आपल्या देशातल्या वीज यंत्रणेस बाधित करू शकतो. त्यामुळे तुम्हीही ‘मी माझ्या घरातील लाईट चालू ठेवणार आणि एकही दिवा पेटवणार नाही’ हा मंत्र अंगीकारत व घरात राहूनच कोरोनाशी मुकाबला करा. – संदीप काटे ( पिं. चिं. शहर राष्ट्रवादी कार्यकर्ते)












