न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ एप्रिल २०२०) :- लॉकडाऊनच्या काळात गरजूंना अन्न पुरविण्याच्या उपक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समन्वयातून विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने आज शहरात विविध ठिकाणी सुमारे ३५,६५३ व्यक्तींना अन्न वाटप करण्यात आले. कोरोना विषाणू संसर्गामुळे आपत्कालीन परिस्थिती उदभवली आहे. या कालखंडामध्ये शहरातील गरजू व्यक्तींपर्यंत अन्न आणि शिधा पोहचविण्यासाठी महानगरपालिकेच्या समन्वयाने विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून काम करीत आहे. यासाठी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक आयुक्त संदिप खोत यांच्या नियंत्रणाखाली विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
यामध्ये क्षेत्रीय पातळीवर आठ विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या कार्यात विविध संघटनांचे स्वयंसेवक सहभागी झालेले आहेत. स्वतःची काळजी घेऊन प्राप्त परिस्थितीमध्ये आपले योगदान हे स्वयंसेवक देत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून सध्या लॉकडाऊन सुरु आहे. अशा परिस्थितीत गरजू नागरिकांना अन्न आणि शिधा स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून शहरातील विविध भागात दररोज वाटप करण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्यासाठी देखील स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून घरपोच सेवा दिली जात आहे. महापालिकेच्या वतीने कार्यकारी अभियंता यांच्या नेवृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करुन या प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्यात आले आहे.
या कार्यामध्ये विश्व हिंदू परिषद, इस्कॉन, बजरंग दल, लक्ष्य फाऊंडेशन, राकेश वार्कोडे फाऊंडेशन, समप्रिय, पीसीसीएफ, पोलिस मित्र नागरिक संघटना, अग्रसेन संघटना, शिव भोजन, संस्कार सोशल फाऊंडेशन, धर्म विकास संस्था, काळभैरवनाथ उत्सव समिती, जनकल्याण समिती आदि संस्था सहभागी
झाल्या आहेत.
महापालिकेच्यावतीने रोजगार नसना-या अथवा स्थलांतरीत मजूरांसाठी विविध ठिकाणी निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहेत. या नागरिकांना निवारा व भोजनासह वैद्यकीय तपासणीची सुविधा महापालिकेच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत खंडोबामाळ आकुर्डी येथील ऊर्दु शाळा, ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत केशवनगर विद्यालय, ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पिंपळे सौदागर येथील अण्णासाहेब मगर विद्यालय, इ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, भोसरी येथील संकुल, ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दापोडी येथील हुतात्मा भगतसींग विद्यालय तर पिंपरी येथील रात्र निवारा केंद्र या ठिकाणी स्थलांतरीत मजुरांची व्यवस्था महानगरपालिकेमार्फत करण्यात आली आहे.
दरम्यान, भोसरी येथील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुल परिसरात आज अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधीं समवेत संवाद साधला. अन्न आणि शिधा वाटप करताना स्वयंसेवक महत्वपूर्ण योगदान देत आहेत त्यामुळे त्यांचे कार्य निश्चितच वाखाणण्यासारखे आहे. गरजूंपर्यंत जीवनावश्यक सेवा देण्यासाठी स्वयंसेवकांनी उत्तम पध्दतीचे व्यवस्थापन आणि नियोजन केले आहे. आपसातील समन्वय आणि मेहनत घेण्याची वृत्ती यामुळे या सर्वांनी नवीन आदर्श उभा केला आहे अशी भावना अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी व्यक्त केली. या कामामध्ये स्वयंसेवकांना येणा-या अडचणींचा आढावा घेऊन त्या दूर करण्यासाठी संबंधित अधिका-यांना मार्गदर्शनपर सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी सहाय्यक आयुक्त संदिप खोत, अण्णा बोदडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, कार्यकारी अभियंता शिरिष पोरेड्डी यांच्यासह समन्वय पथकाती विविध कर्मचारी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.













