न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ एप्रिल २०२०) :- पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दि. ३१ मार्च रोजी एका अपघातग्रस्त रिक्षा चालकावर शस्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रिया करीत असताना या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यामुळे डॉक्टरांनी त्याचे सॅम्पल करोनाच्या तपासणी करता प्रयोगशाळेकडे पाठवले होते. दोनच दिवसांपूर्वी त्या रिक्षाचालकाचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये तो रिक्षाचालक करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले.
यामुळे त्या रिक्षाचालकावर शस्रक्रिया करणारे ४२ डॉक्टर आणि ५० कर्मचारी यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. रिक्षाचालकांवर शस्रक्रिया करणारे ४२ डॉक्टरांचे रिपोर्ट या आधीच निगेटिव्ह आलेले आहेत. दरम्यान त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या ५० कर्मचाऱ्यांचे कोरोना रिपोर्ट देखील आज निगेटिव्ह आले आहेत. याबरोबरच महापालिका रुग्णालयातील १९ संशयितांचे रिपोर्ट देखील निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.













