न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात मास्क न वापरणाऱ्या ३० नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलिसांकडून कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिंजवडी, चिखली, सांगवी आणि निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संबंधित पोलिसांनी अशा कारवाया केल्या आहेत. कारवाईचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात करोनाने थैमान घातले असून करोनाबाधितांचा आकडा हा २६ वर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्यात. करोना हा संसर्गजन्य असल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय परिसरात मास्क न घालणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. शुक्रवारी सायंकाळी सहापर्यंत तब्बल ३० जणांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.












