न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील सक्रीय कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १९ झाली आहे. आज रविवारी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्या एका ४५ वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
हा रुग्ण हिंजवडी परिसरात सुरक्षा रक्षकाचे काम करीत होता. या पुरुषाला गुरुवारी (दि. ९) रोजी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. या रुग्णाला कोणाच्या संपर्कातून कोरोनाची लागण झाली हे अद्याप कळले नाही. मात्र, या रुग्णाच्या हाय रिस्क संपर्कातील आठ जण निगेटिव्ह आले होते.
शहरामध्ये आजपर्यंत एकुण ३१ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आलेले आहेत. या पैकी १२ रुग्ण पुर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. उर्वरित १५ रुग्ण महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात व तीन रुग्ण पुण्यातील रुग्णालयात दाखल असून, रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांचेवर आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.















