न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी सहा करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात आज बुधवारी (दि. १५) रोजी एका नर्सला करोनाची लागण झाली आहे. ही नर्स पुण्यातील खासगी रुग्णालयात नोकरीस असून वास्तव्यास पिंपरी चिंचवड शहरात आहे.
शहरातील करोना बाधितांची संख्या ४४ वर पोहचली असून २७ रुग्णांवर पिंपरी-चिंचवड शहरातील महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. १२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर, चार कोरोना बाधित रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी (दि. ९) एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३१ वर पोहोचली आहे.
शहरातील खराळवाडी, दिघी रोड भोसरी, गव्हाणे वस्ती, भोसरी व संभाजीनगर या परिसरात आज बुधवारी रात्री अकरा वाजल्यापासून प्रवेशबंदी आहे. या दरम्यान येथील परिसरात कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच परिसरातील कोणाला बाहेर जाण्याची परवानगी नसेल. नागरिकांना अत्यावश्यक सेवांसाठीही बाहेर पडण्यास परवानगी नसेल. नागरिकांनी घरातच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक नागरिकांनी मास्क लावणे बंधनकारक केले आहे.


















