न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२०) :- करोनाग्रस्तांच्या संख्येत मंगळवारी आणखी भर पडली. देशात आणखी ९३४ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. त्यामुळे हा आकडा ३०,००० काठावर पोहोचला आहे. सध्या देशात २९४३५ करोनाग्रस्त आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे.
लॉकडाउनमुळे करोनाच्या प्रसारावर काही प्रमाणात परिणाम झाला असल्याचं वेगवेगळ्या अहवालातून समोर आलं आहे. मात्र, आता देशासमोर करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची चिंता उभी ठाकली आहे. गेल्या २४ तासात देशात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. देशभरात ६० जणांचा मृत्यू आहे.
दरम्यान, देशातील आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील परिस्थिती सुधारू लागली आहे. त्यामुळे ३ मे नंतर या जिल्ह्यांना लॉकडाउनपासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत सोमवारी झालेल्या बैठकीत तशी चर्चा झाली आहे. यात लॉकडाउन हटवण्यासंदर्भात राज्यांनी निर्णय घ्यावा, असं केंद्रानं म्हटलं आहे.













