न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२०) :- केंद्र व राज्य शासनाने औद्योगिक तसेच, विकासकामे सुरू करण्यास काही अटींवर मंजुरी दिली आहे. त्यानुसार महामेट्रोने पिंपरी – चिंचवड व पुणे शहरात पुणे मेट्रोचे काम सुरू करण्याच्या कार्यवाहीस सुरुवात केली आहे. त्यानुसार महामेट्रोने संबंधित ठेकेदारांना पत्र देऊन काम सुरू करण्याचा सूचना केल्या आहेत. परिणामी, मेट्रो मार्गिकेचे काम लवकरच सुरू होणार आहे.
संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, केंद्र व राज्य शासनाने औद्योगिक तसेच, इतर विकासकामे सुरू करण्यास काही अटींवर मान्यता दिली आहे. तसा आदेश राज्य शासनाने गुरुवारी (दि. २३) काढला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही याची संपूर्ण खबरदारी घ्यावी. स्वच्छता पाळली जावी. सोशल डिस्टन्सिगचे काटेकोरपणे पालन होईल. कामगारांची राहण्याची व्यवस्था व भोजनाची व्यवस्था त्याच ठिकाणी करावी. प्रत्येक ठिकाणी केवळ ८ ते १० कामगार असावेत. त्यांच्या नाक व तोंडाला मास्क, हातात ग्लोव्हज हवेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जावे. त्यांची नियमितपणे टेम्प्रेचर थर्मल गनने तपासणी केली जावी. स्वच्छतेसाठी सॅनिटायझर व साबण उपलब्ध करून द्यावेत. साईटवरील कामगार व अधिकाऱ्यांची यादी उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना करीत पालिकेच्या आयुक्तांनी महामेट्रोस काम करण्यास नुकतीच परवानगी दिली आहे.
संचारबंदी व लॉकडाऊनमुळे पुणे मेट्रोचे काम बंद करण्यात आले होते. मात्र, राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार मेट्रोचे काम सुरू केले जाणार आहे. पुण्यातील संगम पूल, बंड गार्डन, संभाजी उद्यान या नदीपात्रातील तसेच, पिंपरी – चिंचवड शहरातील दापोडी ते चिंचवडपर्यंत काम सुरू करण्यास परवानगी द्यावी, असे पत्र पुणे व पिंपरी – चिंचवड महापालिकेस तसेच, पोलिस आयुक्तालयांना दिले असून, त्यास परवानगीही मिळाली आहे, असे महामेट्रोचे जनसंपर्क विभाग महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी सांगितले.













