- कामगार, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना स्वगृही जाण्यास परवानगी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२०) :- केंद्रीय गृहमंत्रालयाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित कामगार, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना आपापल्या घरी जाता येणार आहे. गृहमंत्रालयाने अडकलेल्या या सर्वांना प्रवासाला परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.
त्यांची ने-आण करण्याची व्यवस्था राज्य सरकारला करावी लागणार आहे. आपल्या आदेशात गृहमंत्रालयाने राज्यांना अडकलेल्या लोकांना इतर राज्यात पाठवताना कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास सांगितलं आहे. आदेशाप्रमाणे या सर्वांना प्रवासाची परवानगी देण्याआधी तपासणी केली जाणार असून करोनाची लक्षणं नसलेल्यांनाच परवानगी देण्यात येणार आहे.
करोनानुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आले असून अनेक लोक आपल्या घरापासून दूर इतर राज्यांमध्ये अडकले आहेत. यामध्ये स्थलांतरित कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेकांनी तर आपल्य घरी पोहोचण्यासाठी चालत जाण्याचा मार्ग निवडला आहे. यामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागण्याच्याही घटना समोर आल्या आहेत. अनेक राज्यांनी अडकलेल्या कामगार आणि इतरांना आपल्या घरी पोहोचण्यासाठी ट्रेन सुरु कराव्यात अशी मागण केली आहे. त्यातच आता केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक कामगार, विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.













