न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे. २०२०) :- सोमवारपासून सुरु झालेल्या दारू विक्रीमुळे सोशल डिस्टन्स, मास्क व सॅनिटायझर वापरणे आणि कलम १४४ चा ठिकठिकाणी फज्जा उडाला आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपेपर्यंत दारू विक्री बंद करावी अशी मागणी एसीटीएफच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा भारती चव्हाण यांनी केली आहे. भारती चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (५ मे) महाराष्ट्रातील ॲण्टी कोरोना टास्क फोर्सचे (एसीटीएफचे) सल्लागार, सर्व जिल्ह्यातील समन्वयक व तालुका समन्वयक आणि प्रमुख स्वयंसेवकांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली.
यावेळी महाराष्ट्रातील दारू विक्री बंद करण्याबाबत सर्व सल्लागार व समन्वयकांनी आग्रही भूमिका मांडली. सोमवारपासून सुरु झालेल्या दारू विक्रीमुळे राज्यातील महिला भगिनींमध्ये तीव्र असंतोष असून दारू विक्रीस दिलेली परवानगी ताबडतोब मागे घ्यावी, अशा मागणीचे पत्र एसीटीएफच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार असल्याची माहिती भारती चव्हाण यांनी दिली आहे.
वाईन शॉपसमोर उसळणा-या या गर्दीमुळे कोठेही सोशल व फिजिकल डिस्टन्स पाळले जात नाही तसेच कलम १४४ चा भंग होत असल्याचे निदर्शनास येत आहे. ठिकठिकाणी एक किलो मीटर पेक्षाही जास्त तळीरामांच्या रांगा वाइन शॉपसमोर लागल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे उद्योग व्यवसाय, रोजगार ठप्प झाल्यामुळे महिलांना अन्नधान्य मिळणे मुश्किल झाले आहे. तर हातात असणारी तुटपुंजी रोख रक्कम तळीराम दारूसाठी खर्च करीत आहेत. जीवनावश्यक वस्तू किराणा धान्य, भाजीपाल्याचा पुरवठा अद्यापही राज्यात अनेक ठिकाणी विस्कळीत आहे. मुंबई, पुणे, नागपूर या महानगरात रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. ठिकठिकाणी अडकून पडलेल्या मजूरांना, क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना जेवण पुरविणे प्रशासनाला व सामाजिक संस्थांना कठिण जात आहे. अशा परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंग न पाळले जाणारे निर्णय सरकारने घेऊ नयेत. रेड व ऑरेंज हॉटस्पॉट मधील दारू विक्री ताबडतोब बंद करावी, अशी मागणीही भारती चव्हाण यांनी केली आहे.


















