- चिखलीतील तरुणाने वाढदिवसाचा खर्च टाळून, नागरिकांना केली जीवनावश्यक वस्तूंची मदत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मे २०२०) :- सध्या जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. पिंपरी चिंचवड शहरात १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक स्वयंसेवी संस्था गोरगरिबांना मदत करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. तसेच सामाजिक भान जपत काही युवकदेखील मदतीसाठी पुढे येत आहेत.
सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. त्याची जाणीव ठेवून युवा नेते पांडाभाऊ साने यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली- मोरे वस्तीतील किरण जाधव या तरुणाने आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून, जीवनावश्यक गहू, तांदूळ, तेल, तूरडाळ, साखर, मिरची पावडर, हळद या वस्तूंचे कीट तयार करून, गरजू नागरिकांना वाटप केले.
याबाबत बोलताना पांडाभाऊ साने म्हणाले की, चिखलीतील किरण जाधव या तरुणाने आपला वाढदिवस साजरा न करता, वाढदिवसानिमित्त होणारा जो खर्च आहे, तो खर्च टाळून चिखली-मोरेवस्तीतील कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले. आज शहरातील प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून शहरातील गरिबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करीत आहे. आता युवकांनी देखील किरणचा आदर्श घेऊन, या कोरोना युद्धात आपले जमेल तसे योगदान दिले पाहिजे. तरच आपण या संकटावर निश्चित मात करू.


















