न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज गुरुवारी सायंकाळी मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसल्या. उन्हाळा लांबल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पिंपरी-चिंचवड शहरवासियांना या पावसाने दिलासा दिला. मोठ्या प्रतीक्षेनंतर उकाड्यातून सुटका होऊन वातावरणात गारवा पसरल्याने नागरिक याचा आनंद लुटत आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत उकाडा जाणवत होता. त्यानंतर वातावरण हळूहळू बदलत गेले. सायंकाळी सहाच्या सुमारास वारा सुटला. ढगाळ वातावरण निर्माण झाले. सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून विजांचा कडकडाट सुरू झाला. सायंकाळी सातनंतर पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली.
पिंपरी-चिंचवड, आकुर्डी, निगडी, कासारवाडी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड, रावेत या परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. जवळपास एक तासभर पाऊस पडला. त्यांतरही विजेचा गडगडाट सुरूच होता.


















