न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२०) :- तीन दिवसातच बीड शहरासह अकरापैकी आठ तालुक्यात करोनाचा शिरकाव झाला आहे. बीड जिल्ह्यात गुरुवारी २१ मे रोजी १७ रुग्णांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती प्रशासनाने दिली. बुधवारी ११४ जणांच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी लातूर येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. गुरुवारी पहाटे चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर प्रलंबित सर्व १३ रुग्ण करोनाबाधित असल्याचे दुपारी स्पष्ट झाले. तर इतर ९० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
जिल्हा प्रशासनाने टाळेबंदीत पन्नास दिवस करोनाचा शिरकाव सीमेवर रोखला होता. टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात काहीशी ढील मिळताच मुंबई, पुणे येथून परवानगी घेऊन तर काही विनापरवाना लोक जिल्ह्यात घुसले आणि जिल्ह्यात करोनाचा प्रवेश झाला. आतापर्यंत करोनाची बाधा झालेल्याची एकूण संख्या ३७ झाली आहे. यांपैकी २९ रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत. तर सांगवी पाटण (ता. आष्टी) येथील सात करोनाबाधित रुग्णांपैकी एक मयत असून अन्य सहा रुग्ण त्यांच्या इच्छेनुसार पुणे येथे स्थलांतरित झाले आहेत. तर पिंपळा (ता. आष्टी) येथील एक रुग्ण करोनामुक्त झाला आहे.
नवीन रुग्णांमध्ये वाहली (ता. पाटोदा) २, पाटोदा १, वडवणी १, कुंडी (ता. धारूर) १, सुर्डी १ आणि नित्रूड (ता. माजलगाव) ११ यांचा समावेश आहे. बाधितांपैकी केवळ सुर्डी येथील एक रुग्ण करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील असून अन्य सर्व रूग्ण बाहेरच्या जिल्ह्यातून आल्याचे प्रशासनाने सांगितले. बीड शहरासह अकरापैकी आठ तालुक्यात करोनाचा शिरकाव झाल्याने बाहेरून आलेल्या बाधितांमुळे स्थानिकांचा धोका वाढला आहे.
फक्त परळी, अंबाजोगाई आणि शिरूर या तालुक्यात अद्याप एकही करोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. बाधित रुग्ण आढळल्याने पाटोदा शहरासह तालुक्यातील पाच गावे आणि वडवणी येथील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आहेत.















