न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येथील एक फ्लॅट सोलापूरच्या उपमहापौराने नऊ ते दहा जणांना विक्री केला आहे. याप्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खरेदीदारांनी सांगवी पोलिसांकडे तक्रार केली. आरोपी काळे हा सोलापूर भाजपाचा उपमहापौर आहे.
त्यानुसार गेल्यावर्षी आरोपी काळे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तपास सुरू असताना आरोपी सोलापूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सांगवी पोलिसांचे पथक सोलापूरला रवाना झाले. एक अधिकारी व दोन कर्मचारी अशा तीन जणांच्या पथकाने आरोपी काळे याला शुक्रवारी सोलापूर येथून ताब्यात घेतले.
त्यानंतर आरोपीला शुक्रवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. राजेश काळे असे ताब्यात घेतलेल्या उपमहापौराचे नाव आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी करून, याप्रकरणी कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली.