न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. जून. २०२०) :- संत तुकाराम महाराजांचा ३३५ वा पालखी प्रस्थान सोहळा आज होत आहे. संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आज दुपारी २.०० वा. मुख्य प्रस्थान सोहळ्याची सुरुवात होणार आहे. प्रस्थान सोहळ्यानंतर मंदिर प्रदक्षिणा, नियमांचे अभंग व पुन्हा पादुकांचे मंदिरात आगमन. त्यानंतर आरती. सायंकाळी ७ ते ९ कीर्तन सेवा. रात्री ११.०० वा. शेजआरती व त्यानंतर जागर होणार आहे.
यावर्षी शासनाच्या सूचनेनुसार ५० लोकांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न होणार आहे. संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे यांनी सोहळ्याच्या तयारीची माहिती दिली.
या सोहळ्याला वारकरी भाविक उपस्थित राहणार नसल्याने गुरुवारी (दि. ११) संपूर्ण गावात सामान्य वातावरण होते. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी संपूर्ण देऊळवाड्याची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. संस्थानच्या वतीने प्रस्थान सोहळ्याचा दिवसभराचा कार्यक्रम दुपारी जाहीर करण्यात आला.
मुख्य चोपदार, शिंगी, पालखीचे भोई, जरीपटका, गरूडटक्के आर्दीसाठी प्रमुख सेवेकऱ्यांना सोहळ्यास उपस्थित राहता येणार आहे. स्थानिकांनादेखील या सोहळ्यात सहभागी होता येणार नाही किंबहुना पादुकांचे दर्शनही घेता येणार नाही. पोलिसांच्या वतीने देहूकडे येणारे सर्व रस्ते परगावच्या वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. या काळात गावात येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी करण्यात येणार आहे.


















