न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. जून. २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा समितीचा एका वर्षांचा कार्यकाळ रविवारी (दि. १४) रोजी संपत आहे. त्यामुळे महापालिका नियमानुसार समिती बरखास्त होणार आहे.
महापालिका सभागृहाच्या अखत्यारिमध्ये विधी, महिला बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा आणि शिक्षण समितीचा कारभार चालतो. तर, स्थायी समिती बरखास्त करता येत नाही. शिक्षण समिती वगळून इतर समितीची स्थापना १५ जून २०१९ ला झाली होती. त्या समितीचा एका वर्षाचा कार्यकाळ रविवारी संपत आहे.
तर, शिक्षण समितीचा वर्षाचा कार्यकाळ ऑगस्टला संपणार आहे. करोना महामारीमुळे राज्य शासनाने सर्व महापालिकांना निवडणुका घेण्यास व मुदतवाढ देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे समिती बरखास्त झाल्यानंतर लगेच निवडणुका घेता येणार नाहीत. त्यामुळे त्या समित्यांचा कारभार महापालिका सर्वसाधारण सभेमार्फत चालविला जाईल, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.