- पुढील आठवड्यात वायसीएममध्ये कोरोना प्रयोगशाळेची होणार उभारणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातून दररोज सुमारे ३०० ते ३५० जणांचे घशातील घशातील द्रव नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहेत. मात्र, एनआयव्ही, नारी व आयसर संस्थेकडून अहवाल मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे दोन ते तीन दिवस एकत्रित ठेवण्यात आलेल्या संशयितांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे.
या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात स्वतंत्र कोविड लॅब सुरु केली जाणार आहे. आयसीएमआरकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पुढील आठवड्यात वायसीएममध्ये कोविड लॅब सुरु होईल. त्यासाठी २४ लॅब टेक्निशन घेतले आहेत. त्यामुळे तात्काळ चाचण्या होतील, असा विश्वास महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला.
कोरोनाचे अहवाल तातडीने मिळण्यासाठी पालिकेने स्वतः प्रयोगशाळा सुरू करावी किंवा खासगी एजन्सीचे सहाय्य घ्यावे, अशा सूचना मनपा पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना बैठकीत केल्या होत्या.