- प्रलंबित १०३ डॉक्टरांच्या नियुक्तीस विधी समितीची मान्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर संस्थेसाठी १०३ डॉक्टर नियुक्तीस विधी समितीने शुक्रवारी (दि.१२) रोजी मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या संकटात पालिकेस तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होणार आहेत.
सभेच्या अध्यक्षस्थानी समिती सभापती अश्विनी बोबडे होत्या. वायसीएम रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या भरतीसाठी जाहिरात काढली होती. अधिष्ठाता, शल्यचिकित्सक, मेडिसीन प्राध्यापक, कान, नाक व घसा शल्यचिकित्सा, बालरोग चिकित्सा, स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र, भूलशास्त्र, अस्थिरोग चिकित्सा, मानसोपचार शास्त्र, नेत्ररोग, पॅथॉलॉजी, पीएसएस, त्वचारोग, सूक्ष्मजीवशास्त्र, शल्यचिकित्सा, मेडिसीन सहयोगी प्राध्यापक, बालरोग, उरोरोग शास्त्र, रेडिओलॉजी या पदासाठी प्रक्रिया राबविण्यात आली.
३ डिसेंबर २०१९ ला मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर २७ फेब्रुवारीला निवड झालेल्या व प्रतीक्षेतील डॉक्टरांची यादी जाहीर करण्यात आली. निवड झालेले ६० डॉक्टर तसेच तत्पूर्वी भरती केलेले डॉक्टर, असे १०३ जणांच्या नियुक्तीचा हा प्रस्ताव होता. प्रशासनाने सर्व प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर हा प्रस्ताव विधी समितीकडे पाठविण्यात आला होता. कोरोना संकटामुळे अतिरिक्त डॉक्टर, परिचारिकांची वैद्यकीय यंत्रणेला आवश्यकता होती. तरी देखील हा प्रस्ताव मागील तीन ते चार महिने तहकूब होता. मात्र, विधी समितीची मुदत रविवारी (दि.१४) संपुष्टात येत आहे. त्यामुळे अखेर समितीने या प्रस्तावाला शुक्रवारी मान्यता दिली आहे.