न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 20. जून. 2020) :- कंकणाकृति सूर्यग्रहण उद्या रविवारी (दि. 21) रोजी दुपारी १२ च्या सुमारास उत्तरेकडील प्रदेशात दिसणार असून उर्वरीत संपूर्ण भारतामध्ये हे सूर्यग्रहण खंडग्रास दिसणार आहे.
ग्रहणाचा वेध – शनिवारी २० जूनच्या रात्री १०:०० पासून २१ जूनच्या दिवशी ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत.
बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्तींनी आणि गर्भवती स्त्रियांनी दि. २१ च्या पहाटे ४:४५ (पावणे पाच) पासून ग्रहणमोक्षापर्यंत वेध पाळावेत.
ग्रहण स्पर्श होण्याआधी दूध, फळे घेता येतील. मात्र स्पर्श झाल्यानंतर मोक्ष होईपर्यंत काहीही खाऊ पिऊ नये. ग्रहण काळात ज्या ज्या कपड्यांना स्पर्श होईल ते सर्व कपडे धुतल्या नंतरच शुद्ध होतील. यामुळे अंथरूण, पांघरूण, कपाट इत्यादी ठिकाणी ग्रहण काळात स्पर्श करू नये.
वेधामध्ये भोजन करू नये. स्नान, जप, नित्यकर्म, देवपूजा, श्राद्ध ही कर्मे करता येतात.
वेधकाळात आवश्यक असे पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोप इ. कर्मे करता येतात.
ग्रहणातील कृत्ये – ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे.
ग्रहणकालामध्ये (ग्रहण स्पर्श ते पर्वकालापर्यंत) झोप, मलमूत्रोत्सर्ग, अभ्यंग, खाणे-पिणे ही कर्मे करू नयेत.
अशौच (सोयर आणि सुतक) असता ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुद्धि असते.
ग्रहणाचे राशिपरत्वे फल –
मेष, सिंह, कन्या, मकर या राशींना शुभफल.
वृषभ, तुला, धनु, कुंभ या राशींना मिश्रफल.
मिथुन, कर्क, वृश्चिक, मीन या राशींना अनिष्टफल आहे.
ज्यांना अनिष्टफल आहे त्यांनी व गर्भवती महिलांनी ग्रहण पाहू नये.