न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला असून, आता सर्वसामान्य नागरिकांबरोबरच मदतीच्या निमित्ताने मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या नगरसेवकांना देखील कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात आज रविवारी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक शैलेश मोरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. नगरसेवक मोरे यांनी कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
शहराचे आमदार आणि आता नगरसेवकांमध्ये देखील कोरोनाने शिरकाव केला असून, कालच राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. नगरसेवक मोरे हे सुरुवातीपासूनच लोकांना मदत करण्यामध्ये आघाडीवर होते. त्यांनी आनंदनगर व परिसरातील नागरिकांमध्ये जाऊन लोकांना मदतीचा हात दिला होता. पुढील उपचारासाठी त्यांना चिंचवडच्या बिर्ला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वी ताप व कणकण आल्याने माझी कोरोनाची तपासणी करून घेतली असता तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला. माझी प्रकृती स्थिर आहे. तुमच्या आशिर्वादामुळे लवकरच बरा होऊन येईन. आपण सर्वांनी काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे.
– शैलेश मोरे, नगरसेवक पिं. चिं. मनपा.













