- कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे वहन करण्यात पालिकाच उदासीन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. जुलै. २०२०) :- महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गांधीनगर झोपडपट्टीमध्ये तीन दिवसांपूर्वी करोना तपासणी शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरातील नागरिकांचे अहवाल सोमवारी (दि. ६) सकाळी प्राप्त झाले. यामध्ये ३५ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ही बाब समजताच या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या बाधित रुग्णांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात हलविण्याची मागणी केली होती.
दिवसभर हे रुग्ण महापालिकेच्या वाहनाची वाट पाहत ताटकळत राहिले. सायंकाळी पाचच्या सुमारास महापालिकेने पीएमपीची बस पाठवून रुग्णांना उपचारासाठी नेले. महापालिकेकडून होत असलेल्या विलंबामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान करोनाची लक्षणे आढळलेल्या अत्यवस्थ रुग्णांना उपचाराकरिता वायसीएममध्ये तर लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना बालेवाडी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
चाचणी दरम्यानच आम्ही मागणी केली होती की, परिसरात असलेल्या दोन शाळांमध्ये क्वॉरंटाइनची व्यवस्था करण्यात यावी. या शाळांच्या आसपास वस्ती नसल्याने नागरिकांचा विरोध होणार नाही. परंतु पालिका प्रशासनाने आमच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. आज जेव्हा बाधित असल्याचे अहवाल आले तेव्हा त्यांना कुठे ठेवायचा असा प्रश्न पालिकेसमोर उभा राहिला आहे. येथे जास्त वेळ रुग्ण ताटकळत ठेवणे योग्य नाही, असे मत सामाजिक कार्यकर्ते सचिन गुंजाळ यांनी व्यक्त केले.