न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. जुलै. २०२०) :- करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिघीकरांनी एकत्र येत तीन दिवसांचा कडकडीत बंद पुकारला आहे. आज मंगळवार (दि. ७) पासून गुरुवारपर्यंत हा बंद असणार आहे. या बंदमध्ये फक्त मेडिकल व दवाखाने सोडून इतर भाजी व किराणामालासह सर्वच दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
दिघी ग्रामस्थांमध्ये जनजागृतीसाठी ध्वनिक्षेपकाद्वारे संदेशही देण्यात आला आहे. दिघीतील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सध्या ४५ आहे. त्याचप्रमाणे दिवसेंदिवस या संख्येमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे दिघी ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी (दि. ४) सोशल मीडियादवारे संपर्क साधत चर्चा करण्यात आली.
या चर्चेमध्ये ग्रामस्थांच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. दिघीगावामध्ये स्वतंत्र भाजी मंडई नाही. त्याचप्रमाणे महापालिकेच्या वतीने करोनापासून बचावासाठी तात्पुरत्या स्वरुपात भाजीमंडई सुरू करण्यासाठी पुरेशी मोठी जागाही उपलब्ध नाही. त्यामुळे भाजी, फळे विक्रेत्यांना रस्त्याच्या कडेलाच विक्रीसाठी बसावे लागत आहे, अशा अनेक गोष्टींमुळे परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती नगरसेवक विकास डोळस यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना दिली.