न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोना संशयीतांची तपासणी (स्वॅब टेस्टींग) मोठया संख्येने करणे आवश्यक होते.
त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आरटीपीसीआर, रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट प्रयोगशाळेचे उद्घाटन आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील पदव्युत्तर संस्थेतील केंद्रीय संशोधन विभागात संशयित कोवीड १९ आजाराची लक्षणे असलेल्या रूग्णांच्या अथवा रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीत कोवीड १९ चा विषाणू आहे किंवा नाही याचे निदान करण्यासाठी आवश्यक असणारी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशी RT PCR लॅब तयार करण्यात आली आहे.
दिनांक १ जुलै २०२० रोजी लॅबमध्ये रुग्णांच्या घशातील/नाकातून/श्वास नलिकेतील द्रव नमुना घेऊन त्यात SARS-COV-2 या विषाणूंचा अंश आहे किंवा नाही याची तपासणी करण्याची परवानगी आय.सी.एम.आर., दिल्ली यांनी दिली आहे. वरील तपासणीत विषाणूच्या आर.एन.ए. च्या अब्जावधी प्रतिकृती तयार करून त्यानंतर तो विषाणू कोवीड-१९ आजाराचा आहे किंवा नाही यावर अचूक शिक्कामोर्तब केले जाते. वरील तपासणीसाठी अंदाजे ५-६ तास लागतात. तसेच कोवीड-१९ या आजाराच्या तपासणीसाठी Antigen testing Rapid Card टेस्ट द्वारे करता येते. या तपासणीत रूग्णांच्या नाकातून द्रव्य घेऊन ते buffer मध्ये टाकून त्याचे ३ थेंब किटमध्ये टाकून १०-३० मिनिटांत अहवाल प्राप्त होतो. अहवाल पाॅझिटिव्ह आल्यास त्या रूग्णांस कोवीड-१९ हा आजार आहे व अहवाल निगेटिव्ह आल्यास त्याचे RT PCR testing करण्यासाठी सॅमपल्स घ्यावे लागते.
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसदस्य योगेश बहल, नगरसदस्या सुजाता पालांडे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, डॉ. प्रविण सोनी, पॅथॅलाजिस्ट डॉ. तुषार पाटील, मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. नितीन मोकाशी, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदि उपस्थित होते. या नविन उपकरणांमुळे मोठया संख्येने रुग्णांची स्वॅब तपासणी कमी वेळात होणार आहे.












