- जून महिन्यातील तांदूळासाठी लाभार्थ्यांना अद्यापही प्रतीक्षा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. जुलै. २०२०) :- पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतंर्गत गेल्या तीन महिन्यांत शिधापत्रिकेवर (रेशनकार्ड) मोफत ५ किलो तांदूळ देण्यात आला. जून महिन्यातील तांदूळ उशिरा आल्याने अद्याप त्याचे वाटप अपूर्ण आहे. १० तारखेपर्यंत हे वाटप पूर्ण केले जाणार आहे. केंद्र सरकारने गरिबांना नोव्हेंबरपर्यत धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्याप त्याचा आदेश आलेला नसल्याने जुलै महिन्यापासून वाढीव मुदतीच्या धान्य वाटपासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेत गरीबांना नोव्हेंबरपर्यंत धान्याचा मोफत पुरवठा करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. सरकारकडून गरीब कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पाच किलो गहू किंवा तांदूळ आणि एक किलो डाळ दिली जाणार आहे. ही योजना यापूर्वी एप्रिल ते जून अशा तीन महिन्यांसाठी लागू होती. ज्यांचे आधारकार्ड आणि रेशनकार्ड लिंक केलेले नाही त्यांना ते लिंक करून घेण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत दिलेली आहे. जुलैपासून नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य वाटपाबाबत सरकारकडून रास्त भाव धान्य दुकानदारांना कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाही. तसेच, त्यासाठी आवश्यक धान्यही मिळालेले नाही. त्यामुळे जुलैपासूनच्या मोफत धान्य वाटपासाठी आदेशाची प्रतीक्षा आहे.
जून महिन्यात मोफत वाटपासाठी शहरातील रास्त भाव धान्य दुकानदारांना देण्यात आलेला तांदूळ मे महिन्याच्या अखेरीस मिळाला. त्यामुळे योजनेत पात्र असलेल्या सर्व रेशनकार्ड धारकांना तांदुळ वितरित होऊ शकलेला नाही. अद्याप काही रेशनकार्ड धारकांना हा तांदूळ देणे बाकी आहे. संबंधित तांदळाचे वाटप १० तारखेपर्यंत पूर्ण करण्यासाठी मुदत दिलेली आहे, अशी माहिती ऑल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकिपर असोसिएशनचे खजिनदार विजय गुप्ता यांनी दिली.


















