- आगामी महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका ‘आप’ च्या रडारवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. जुलै. २०२०) :- आम आदमी पक्षाद्वारे आयोजित ऑनलाइन मेळाव्यामध्ये पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी व राजकीय सल्ला समितीचे सदस्य दुर्गेश पाठक यांनी राज्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले. या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी ‘आप’ स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूकीत जोमाने उतरणार असल्याचे स्पष्ट केले.
येणाऱ्या नवी मुंबई, औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली व कोल्हापूर महापालिकांसाठी राज्य समितीबरोबर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे, किशोर मंध्यान, धनंजय शिंदे, प्रीती मेनन व अजिंक्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘आप’ ने कंबर कसली असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले.
२०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड व नागपूर महापालिका देखील ‘आप’च्या रडारवर असल्याचे दुर्गेश पाठक यांनी सांगितले. भारतातील सर्वात श्रीमंत महापालिका समजली जाणारी बृहन्मुंबई महानगरपालिकेवर ‘आप’चे विशेष लक्ष असणार असून महापालिकेच्या माध्यमातून दर्जेदार सेवा पुरवणार असल्याचे पाठक यांनी नमूद केले.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या भूमीत अनेक राजकीय पक्षांनी सत्ता अजमावली, परंतु ते सामान्य नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवण्यात अपयशी ठरले. राज्यातील मतदारांना आम आदमी पक्ष पर्याय म्हणून समोर येत असून तो आता निवडणुकीच्या रिंगणात सक्षमपणे उतरणार असल्याचे पाठक यांनी या मेळाव्याद्वारे सांगितले.















